"असावा सुंदर चॉकलेटचा बंगला... चंदेरी, सोनेरी चमचमता चांगला..." हे बालपणीचे सुप्रसिद्ध गाणं आजही आपल्या लक्षात असेल. चॉकलेट हा आपल्या सगळ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. चकचकीत रंगीबेरंगी कागदांच्या रॅपरमध्ये गुंडालेलं गोड चॉकलेट सगळ्यांनाच भुरळ पाडत. या रंगीत रॅपरमधील चॉकलेट उघडून पटकन तोंडात टाकून मग जिभल्या चाटत त्याचा आनंद घेण्याचा मोह कोणत्याही वयात आपल्याला आवरता येत नाही. या चॉकलेटचा वापर आपण खाण्यासाठी तर करतोच परंतु चॉकलेट केक, चॉकलेट मूस यांसारखे चॉकलेट पासून बनलेले अनेक पदार्थ आपण खातोच.
या चॉकलेट आणि रंगीबेरंगी गोळ्यांचा वापर करून आपण लग्न, मुंज, बोरं न्हाणं यांसारख्या खास दिवशी रुखवत बनविण्यासाठी म्हणूनसुद्धा वापर करतो. चॉकलेट पासून तयार झालेला रुखवत हा दिसायला खूपच सुंदर दिसतो. याचं चॉकलेटचा वापर करून जर कोणी आपली हेअर स्टाईल केली असेल तर...होय.. हेअर स्टाईल!!!! सध्या पॅरिस फॅशन वीकचे वारे सगळीकडे वाहत आहे. या पॅरिस फॅशन वीकमध्ये मॉडेल्सनी वेगवेगळ्या प्रकारचे कल्पनेपलीकडचे कपडे परिधान केल्याचे आपण सगळ्यांनी पाहिलेच असेल. परंतु त्याही पुढे जाऊन सोशल मीडियावर एका मुलीने या चॉकलेट्सचा अजब - गजब केलेला वापर बघून नेटकरी देखील तिचा हा लूक बघून आश्चर्यचकित झाले आहेत(Social Viral : Beautiful Chocolates Hair Style).
नक्की काय आहे या व्हिडिओत...
chitras_makeup_artist_28 या इंस्टाग्राम पेजवरून मेकअप आणि हेअरस्टाईल ट्युटोरियलचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये, त्या मुलीने केसांत फुल, गजरा माळण्याऐवजी चक्क चॉकलेटची फुल आणि चॉकलेट्सचा गजरा माळला आहे. या व्हिडीओमधील एक महिला मेकअप आणि हेअरस्टाईल कशी करायची हे शिकवत आहे. हे शिकवत असताना ती एका मुलीचा मेकअप आणि हेअरस्टाईल करत आहे. आपण केलेली हेअर स्टाईल अधिक सुंदर दिसण्यासाठी फुल, गजरा माळला जातो. परंतु या महिलेने चक्क चॉकलेटचा गजरा तयार करून केसांत माळला आहे. हा चॉकलेट्सचा गजरा तयार करण्यासाठी अनेक ब्रॅंड्सचे चॉकलेट एकत्र करून त्यांना जोडून हा गजरा तयार केला आहे. हा चॉकलेट्सचा गजरा केसांत माळून ती अतिशय सुंदर दिसत आहे. या मुलीने परिधान केलेले कमरपट्टा, बिंदी, गळ्यात नेकलेस, कानातले हे सगळेच चॉकलेट पासून तयार केलेले आहे. तिने परिधान केलेल्या पिवळ्या रंगाच्या सुंदर लेहेंग्यावर रंगीबेरंगी चॉकलेट्स अतिशय उठून दिसत आहेत.
नेटकरी काय म्हणत आहेत... नेटकऱ्यांनी तिचा हा चॉकलेट्स पासून तयार झालेला लूक पाहून काहींनी तिला फारच ट्रोल केले आहे तर काहींनी तिचे कौतुक केले आहे. "जेव्हा तुमच्याकडे दागिने घ्यायला पैसे नसतात..", "क्रिएटिव्हिटी छान आहे.. पण त्याचा उपयोग नाही..", "कपडे पण चॉकलेट्सचेच का नाही तयार केले.." "लहान मुलांना दाखवू नका.." , " क्रिएटिव्हिटी छान आहे....", " उत्तम कल्पना आहे..." अशा संमिश्र प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.