जगात सगळ्या गोष्टींची जागा भरुन निघू शकते पण आईची जागा कोणीही भरुन काढू शकत नाही. म्हणूनच आईचे आपल्या आयुष्यात असणारे स्थान आपण शब्दांत मांडू शकत नाही. न सांगताही आपल्या मुलाची प्रत्येक गोष्ट जिला या हृदयीचे त्या हृदयी समजते त्या आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. मात्र आई असेपर्यंत आपल्याला तिची किंमत कळत नाही. पण एकदा ती हे जग सोडून गेली की मात्र आपल्याला प्रत्येक क्षण खायला उठतो. आई ही प्रत्येकाच्या जीवनातला एक हळवा कोपरा व्यापून राहीलेली असते. आईविषयीचे काही व्हिडिओज पाहून आपण अनेकदा भावूक होतो. पण गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ पाहून आपल्या डोळ्यात पाणी आल्यावाचून राहणार नाही. या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा आपल्या आईची आठवण काढून एक अतिशय इमोशनल असे गाणे गात आहे.
प्रसिद्ध भोजपूरी सुपरस्टार असलेले खेसारी लाल यांचे ‘माई बिना जिंदगी अधुरा’ हे गाणे हा लहानगा मुलगा म्हणताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. गाणे म्हणतानाचे त्याच्या आवाजातील आणि चेहऱ्यावरील भाव त्याच्या वेदना व्यक्त करत असल्याचे दिसते. हे गाणे गाताना खुद्द खेसारी लाल हेही अतिशय भावूक झाले होते. हा लहान मुलगा एका लाकडाच्या बाकड्यावर बसला असून अतिशय तालासुरात हे गाणे म्हणून आपल्या आईची आठवण काढत असल्याचे दिसते. ते म्हणताना त्याच्या डोळ्यातून पाणी येत असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे.
एका मुलाच्या आयुष्यात आईचे स्थान काय असते हे आई नसलेले मूलच सांगू शकते. आईशिवाय मुलाचे कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही अशा आशयाच्या या गाण्याचा व्हिडिओ फेसबुकवर बनारसी बीटस या ग्रुपवर शेअर करण्यात आला आहे. संगीताचे कोणतेही औपचारीक शिक्षण न घेता हा मुलगा अतिशय तालात गात असलेले गाणे ऐकून आपल्या डोळ्यात पाणी आले नाही तरच नवल. ‘हृदय के भाव संगीत के रुप मे बाहर निकले’ अशी कमेंट एकाने या पोस्टवर केली आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत २१ हजारहून अधिक जणांनी पाहिला आहे. तर अनेकांनी त्याला लाईक करत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.