Join us  

औरंगाबादच्या मुलींची कमाल, प्लास्टिकच्या बाटल्या-पिशव्या वापरून बांधलं टुमदार देखणं घर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2022 5:27 PM

House From Plastic Bottles: फेकून दिलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून एवढी सुंदर गोष्ट आकाराला येऊ शकते, हे प्रत्यक्ष बघूनही खरं वाटत नाही.. त्यामुळेच तर अतिशय देखणं ठरलंय नमिता आणि कल्याणी यांचं 'वावर'

ठळक मुद्दे त्यांनी बनवलेलं प्लास्टिकचं टुमदार, देखणं घर आता सर्वांना बघण्यासाठी खुलं झालं..सर्व छायाचित्रे- शकील खान

पर्यावरणासाठी प्लास्टिक आणि प्लास्टिकच्या बाटल्या (plastic bottle) किती घातक आहेत, हे आपण जाणतोच.. पण तरीही त्याचा वापर काही कमी होत नाही. दिवसभरातून पाण्याच्या, कोल्ड्रिंक्सच्या हजारो बाटल्या  कचरा (plastic waste) म्हणून एकेका शहरात जमा होतात. याच बाटल्यांचा नेमका आणि अतिशय देखणा प्रयोग केला आहे औरंगाबाद जिल्ह्यातील शरणापूर (Sharnapur, Daulatabad Road) येथील दोन मैत्रिणींनी.

Photo Credit- Shakeel Khan

नमिता कपाले आणि कल्याणी भारंबे (Namita Kapale and Kalyani Bharambe) असं त्या दोघींचं नाव. ५ जून या जागतिक पर्यावरण दिनी (world environment day) त्यांच्या या कलाकृतीचं अनावरण झालं आणि त्यांनी बनवलेलं प्लास्टिकचं टुमदार, देखणं घर आता सर्वांना बघण्यासाठी खुलं झालं..

 

नमिता आणि कल्याणी या दोघीही फाईन आर्ट्सचे शिक्षण घेत आहेत. लाॅकडाऊन होते तेव्हा कॉलेज बंद असल्याने दोघी मैत्रिणी घरीच होत्या. असंच इंटरनेटवर सर्चिंग (internet searching) करत असताना त्यांना गुवाहाटी येथील विद्यार्थ्यांनी प्लास्टिकच्या बाटल्या वापरून केलेली एक कलाकृती दिसली. ही आयडिया त्यांना भारीच क्लिक झाली आणि त्यांनी तसाच प्रयोग करायचा ठरवला. जागा शोधण्यापासून ते प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करण्यापर्यंत सगळेच करायचे होते. एका शेतातली जागा तर त्यांनी निश्चित केली मग शोध सुरू झाला तो प्लास्टिकच्या बाटल्यांचा आणि प्लास्टिक पिशव्यांचा..

Photo Credit- Shakeel Khan

असं बनवलं घरत्यांनी खेडेगावात शोभेल असं घर बनवायचं ठरवलं. त्यामुळे बाटल्या आणि प्लास्टिक त्यांना भरपूर प्रमाणात लागणार होते. त्यासाठी त्यांनी गावातील कचरा वेचकांशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडून बाटल्या जमा केल्या. नातलग, मित्रमंडळी, परिसरातील दुकाने आणि कॉलनीतील इतर घरांमध्येही त्यांनी सूचना देऊन ठेवल्या. त्यानुसार सगळीकडूनच त्यांच्याकडे बाटल्या आणि प्लास्टिकचा ओघ सुरु झाला.

Photo Credit- Shakeel Khan

प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये अगदी खच्चून प्लास्टिकच्या पिशव्या भरायच्या, त्यातली सगळी अतिरिक्त हवा काढून घ्यायची आणि ती बाटली पॅक करायची. अशा पद्धतीने त्यांनी प्लास्टिक बाटल्यांपासून अशा आगळ्या- वेगळ्या पद्धतीच्या प्लास्टिकच्या विटा बनवल्या. अशा पद्धतीने तयार केलेल्या बाटल्यांच्या विटा एकमेकांवर रचल्या आणि त्याला माती व शेण यांचे मिश्रण करून लिंपण केले. आणि घराच्या भिंती तयार झाल्या. त्यांच्या या प्रयोगात आलेल्या अडचणी सोडविण्यासाठी गुगल तर मदतीला होतेच. 

 

घराचे छत तयार करण्यासाठी...घराचे छत तयार करण्यासाठी त्यांनी बांबू आणि लाकूड यांचा वापर केला आहे. घराचे दरवाजे आणि खिडक्या लाकडाचे आहेत. जवळपास ४ हजार चौरस फुटांवर त्यांनी हे घर उभारले असून यासाठी तब्बल १६ हजार प्लास्टिकच्या बाटल्या आणि जवळपास १५ टन प्लास्टिक पिशव्या लागल्या. आज प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिकच्या बाटल्या हा पर्यावरणाच्या दृष्टीने खरोखरंच चिंतेचा विषय होत आहे. त्यांचा जर अशा पद्धतीने वापर करता आला, तर नक्कीच प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतो, हेच या दोघींनी त्यांच्या या अनोख्या प्रयोगातून दाखवले आहे. त्यांच्या या घराला त्यांनी 'वावर' हे नाव दिलं आहे. 

Photo Credit- Shakeel Khan

 

टॅग्स :पर्यावरणसोशल व्हायरलइंटरनेटगुगलऔरंगाबाद