आजकालच्या मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून यशाचे शिखर गाठत आहे. मुली भारताचे नाव सातासमुद्रा पार नेत आहे. भारतात दरवर्षी २४ जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात येतो. यावर्षी देश १५ वा राष्ट्रीय बालिका दिन साजरा करत आहे. २००८ साली महिला आणि बाल विकास मंत्रालय आणि भारत सरकार यांनी बालिका दिन साजरा करण्यास सुरुवात केली. हा दिवस साजरा करण्यामागे मुख्य उद्देश समाजात आणि विविध क्षेत्रात मुलींना भेडसावणाऱ्या असमानता, भेदभाव आणि शोषणाविषयी जागरूकता पसरवणे हे आहे. चला तर मग या दिवसामागचा इतिहास जाणून घेऊया.
राष्ट्रीय बालिका दिन का साजरा केला जातो?
देशभरात २४ जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय बालिका दिन साजरा करणे महत्वाचे आहे कारण, या दिवशी आपल्या समाजात मुलींच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यात येते. हा दिवस देशातील मुलींना भेडसावणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी अपेक्षित असलेल्या कृतींवर लक्ष केंद्रित करतो.
या दिवशी इंदिरा गांधी यांनी पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून देशाची सूत्र हाती घेतली होती. २४ जानेवारी १९६६ रोजी इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रीय बालिका दिन नारी शक्तीची एक जाज्वल्य ओळख म्हणून इंदिराजींना समप्रित करण्यात आले. यासह बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा वर्धापन दिन देखील या दिवशी साजरा करण्यात येतो. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून २४ जानेवारी रोजी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावर्षीचा राष्ट्रीय बालिका दिनाचे थीम
दरवर्षी राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त एक थीम आयोजित केली जाते. यावर्षी १५ वा ''गर्ल चाईल्ड डे'' साजरा करण्यात येत आहे. या वर्षीचा थीम ''डिजिटल पिढी आमची पिढी'' ही आहे. गतवर्षी ‘उज्ज्वल उद्यासाठी , मुलींना सक्षम करा’ ही थीम ठरवण्यात आली होती.
या राष्ट्रीय बालिका दिनाच्या निमिताने मुलींना आपल्या संविधानिक हक्क व अधिकाराबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.
कलम १४ – मूलभूत अधिकार व कायद्यासमोर सर्व समान
कलम १५ – वंश, धर्म, जात, लिंग किंवा जन्मस्थान या आधारावर भेदभाव करण्यास प्रतिबंध
कलम १६ - सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत संधीची समानता
कलम १९ -भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कोणताही व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य
कलम २१ - जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण,
कलम २१ – गोपनीयतेचा अधिकार,
कलम ३०० अ – मालमत्तेचा अधिकार