घर छोटं असू देत किंवा मोठं , आपलं घर सगळ्यांनाच आवडतं. ते इतरांनाही आवडावं, घरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला, इतरांना छान प्रसन्न वाटायला हवं अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी घराला फ्रेश करणं, सुगंधित करणं ( how to make room smell fresh) हे पर्याय असतात. घराची साफसफाई केल्यानं, जाळी जळमटं काढल्यानं घर स्वच्छ दिसतं. पण घरात विविध कारणांनी कसला ना कसला वास येत राहातो. कोणाच्या घरात फोडण्यांचा, तर कुणाच्या घरात औषधांचा, कोणाच्या घरात कुबट असे कसलेसे वास येत राहातात, जे बाहेरुन घरात प्रवेश केल्यानंतर एकदम नाकात जातात. या वासांनी मूडच जातो. सणवार म्हटलं की घरातली स्वच्छता होते पण घरात असलेले वास घालवण्यासाठी काय करायला हवं, घरगुती काही उपाय करता येतील का? याचा शोध अनेकजण घेत असतात. घर सुगंधित करण्याचे उपाय अगदी सहज करुन बघता येण्यासारखे आहेत. आपल्या रोजच्याच वापरातल्या (home remedies for room smell fresh) गोष्टींनी घर सुगंधित तर करता येतंच पण त्यासोबत आपलं मनही प्रसन्न होतं.
Image: Google
घर सुगंधी करणारे पर्याय
1. घर सुगंधी करण्यासाठी रुम फ्रेशनर विकतच आणायला हवेत असं नाही. विकतच्या रुम फ्रेशनरनं अनेकांना ॲलर्जीचाही त्रास होतो. त्यामुळे घरच्याघरी रुम फ्रेशनर तयार करणं हा सोपा उपाय आहे. घरच्याघरी रुम फ्रेशनर तयार करण्यासाठी कोणतंही सेंटेड ऑइल , अर्धा कप व्हिनेगर आणि दोन कप पाणी घ्यावं. एका भांड्यात पाणी व्हिनेगर आइ सेंटेड ऑइल एकत्र करावं. हे मिश्रण एका स्प्रे बाॅटलमध्ये भरावं. सर्व खोल्यांमध्ये हा स्प्रे फवारला की घरात छान मंद सुवास दरवळतो.
2. स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांचा उपयोग घर सुगंधी ठेवण्यासाठी करता येतो. यासाठी लवंग, दालचिनी आणि वेलची घ्यावी. 3 कप पाणी घ्यावं. एका भांड्यात पाणी घ्यावं. त्यात हे मसाले घालावेत. मसाले घातलेलं हे पाणी 15-20 मिनिटं उकळू द्यावं. पाणी गार झाल्यावर ते गाळून घ्यावं आणि स्प्रे बाॅटलमध्ये भरावं. घर सुगंधित ठेवण्याचा हा सोपा पर्याय आहे.
3. स्वयंपाक घरातला वास घालवण्यासठी कापूर वापरावा. यासाठी घरातलं जुनं न वापरलं जाणारं भांडं घ्यावं. ते गरम करावं. गरम भांड्यात कापराच्या 2-3 वड्या घालाव्यात. कापराचं हे भांडं स्वयंपाकघरात ठेवलं तरी कापुराचा सुगंध घरभर दरवळतो.
Image: Google
4. लिंबू, संत्री, मोसंबी या सालांचा उपयोग रुम फ्रेशनर तयार करण्यासाठी करता येतो. यासाठी लिंबू/ संत्री/ मोसंबी/ एकत्रित सालं घ्यावी/ ती पाण्यामध्ये घालून पाणी 10 मिनिटं उकळावं. पाणी उकळलं की गॅस बंद करावा. पाणी थंड झाल्यावर ते स्प्रे बाॅटलमध्ये भरावं. हे पाणी घरातल्या सर्व खोल्यांमध्ये फवारलं की मन फ्रेश करणारा सुवास घरभर दरवळतो.
5. दालचिनी तेल, गुलाब पाणी आणि बेकिंग सोडा यांचा एकत्रित उपयोग करुन एयर फ्रेशनर तयार करता येतं. यासाठी काचेची बाटली, कागद, दोरी किंवा जाड धागा, 4 चमचे बेकिंग सोडा, 5 थेंब दालचिनी तेलाचे थेंब आणि थोडं गुलाबपाणी घ्यावं. सर्वात आधी काचेच्या बाटलीत बेकिंग सोडा घालावा. नंतर त्यात गुलाब पाणी आणि दालचिनी तेल घालावं. काचेच्या बाटलीच्या तोंडावर कागद लावावा. तो दोरीनं किंवा जाड धाग्यानं बांधावा. कागदाला सुईनं छिद्रं पाडावी. या छिद्रातून सुगंध दरवळत राहातो.
6. घर सुगंधित करण्याचा सोपा पर्याय म्हणजे घरात अगरबत्ती लावणं. घराच्या कोपऱ्यात अगरबत्ती लावावी. घर मोठं असल्यास दोन तीन कोपऱ्यात अगरबत्ती लावावी किंवा धूप लावावा. या उपायानं घर सुगंधित राहातं.
Image: Google
7. घरात ताजी सुगंधी फुलं आणून ठेवल्यास घरात फुलांचा मंद सुगंध दरवळत राहातो. मोगऱ्याची किंवा निशिगंधाची फुलं आणून ठेवल्यास घर सुगंधित राहातं.
Image: Google
8. इसेन्शियल ऑइलचा उपयोग करुनही घर सुगंधित ठेवता येतं. यासाठी 1 कप पाण्यात थोडंसं इसेन्शियल ऑइल घालून द्रावण तयार करावं. हे द्रावण एका स्प्रे बाॅटलमध्ये भरुन ते घरात फवारल्यास घरातला दुर्गंध/ विशिष्ट प्रकारचा वास गायब होतो.