नवरात्र म्हटले की देवीची पूजा, गरबा आणि दांडीयांची धमाल यासोबतच आणखी एक गोष्ट असते ती म्हणजे भोंडला किंवा हादगा. खेडेगावांमध्ये आवर्जून खेळला जाणारा हा खेळ शहराच्या फ्लॅटसंस्कृतीतही उत्साहाने खेळला जातो. भोंडला म्हटलं की लहान मुली आणि महिलांनी फेर धरुन म्हटलेली गाणी आणि त्यानंतर सगळ्यांनी मिळून खाल्लेली खिरापत. एकमेकांची खिरापत ओळखण्याची मजाही काही औरच असते. मग गोड की तिखट, विकतचे की घरचे, पातळ की घट्ट असे क्लू देऊन ही खिरापत ओळखली जाते. लहान मुलींना तर ही ओळखताना विशेष मज्जा येते. जो कोणी ही खिरापत ओळखून दाखवेल ती मुलगी अशावेळी भाव खाऊन जाते (Navratri bhondla hadga khirapat food options).
रोजच्या धावपळीतून मनाला आराम मिळण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या सणांमागे नक्कीच काहीतरी प्रयोजन असणार असं आपल्याला नकळत वाटून जातं. नवरात्रीनंतर कोजागरी पौर्णिमेपर्यंत साजरा केला जाणारा हा भोंडला म्हणजे सोसायटीतील लोक, मित्रमंडळी, नातेवाईक यांनी एकत्र येण्याचे एक निमित्तच असते. तुम्हीही भोंडल्यामध्ये सहभागी होणार असाल किंवा तुम्हीच त्याचे आयोजन केले असेल तर घरच्या घरी झटपट तयार होतील असे काही सोपे पदार्थ आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुमचे काम तर झटपट होईलच पण हे पदार्थही पौष्टीक आणि पोटभरीचे होतील.
१. दही पोहे
घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून हा पदार्थ करता येतो. पोटभरीचा आणि सगळ्यांच्या आवडीचा हा पदार्थ करायलाही सोपा असतो. तळलेले दाणे, कडीपत्ता, खाराची मिरची आणि जिऱ्याची फोडणी देऊन साखर, मीठ, कोथिंबीर आणि दही घालून पोहे कालवले की झटपट काम होते. आंबट-गोड चवीचे हे पोहे खायलाही छान लागतात.
२. वाटली डाळ
हरभरा डाळ भिडवून मिक्सरमध्ये वाटली की ही डाळ झटपट तयार होते. फोडणीमध्ये ही डाळ परतून त्यात लिंबू, मीठ, तिखट, कोथिंबीर घातली की त्याला छान खमंग चव येते. ही डाळ प्रोटीन्स देणारी असल्याने लहान मुलींसाठी फायदेशीर ठरते.
३. तळण
घरात पापड, कुरडई, बॉबी, तांदळाच्या पापड्या, मिरगुंड असं काही ना काही जरुर असतं. हे सगळं थोडं थोडं एकत्र करुन तळलं तरी ते भरपूर होतं. लहान मुलींना असं कुरकुरीत आवडत असल्याने भोंडल्यासाठी हा एक छान पदार्थ होतो.
४. भेळ
चुरमुरे, फरसाण यांची कोरडी भेळ बहुतांशवेळा आपल्या घरात असतेच. यामध्ये कांदा-टोमॅटो आणि कोथिंबीर घातली की सगळ्यांच्या आवडीचा भेळभत्ता अगदी सहज तयार होऊ शकतो. यामध्ये आवडीनुसार मटकी, चिंच-गुळाचं पाणी असं घालून आपण हीच भेळ ओलीही करु शकतो.
५. पातळ पोह्याचा चिवडा
पातळ पोहे, चुरमुरे, शेंगादाणे, खोबरं, डाळं यांचा चिवडा आधीच करुन ठेवला तर भोंडल्याला तो खिरापत म्हणून देता येऊ शकतो. या चिवड्यावर शेव, टोमॅटो, कोथिंबीर घातले की ते फार छान लागते. आवडीनुसार चिवडा करताना त्यामध्ये लसूण, मिरच्या, सुकामेवा असं काहीही घालू शकतो. लहान मुलींच्या आवडीचा, पोटभरीचा आणि तरीही झटपट होणारा हा पदार्थ खिरापत म्हणून छान पर्याय आहे.