नवरात्रीमध्ये अनेकांकडे घट बसतात. गणपतीमध्ये ज्याप्रमाणे आपण बाप्पाची सकाळ-संध्याकाळ आरती करतो त्याचप्रमाणे नवरात्रीतही देवीची आरती केली जाते. नैवेद्य दाखवला जातो. हाच नैवेद्य आपण प्रसाद म्हणून आरतीला उपस्थित असणाऱ्यांना वाटतो. एकीकडे देवीचे आरतीचे ताट, रांगोळी, स्वत:चे आवरणे, घराची स्वच्छता आणि इतर बऱ्याच गोष्टी असतात. त्या करता करता ९ दिवस रोज सकाळ-संध्याकाळ काय नैवेद्य दाखवायचा असा प्रश्न महिलांना पडतो. त्यातही बऱ्याच जणांचे उपवास असल्याने शक्यतो उपवासाला चालेल असा नैवेद्य लागतो. सहज करता येईल किंवा आणता येईल असे नैवेद्याचे काही सोपे पर्याय आज आपण पाहूया. जेणेकरुन बाकी तयारी करता करता हे एक महत्त्वाचे काम मार्गी लागून जाते (Navratri special devi aarti naivedya prasad easy options).
१. दूध
दूध किंवा मसाला दूध हा नैवेद्य म्हणून सोपा आणि चांगला पर्याय ठरु शकतो. डिस्पोजेबल ग्लासमध्ये हे दूध देणे सोयीचे असते त्यामुळे कामही वाचते. याच दुधात आपण आवडीप्रमाणे सुकामेवा, केशर, वेलची पावडर असे काहीही घालू शकतो.
२. तळण
आपल्याकडे उपवासाला चालेल असे वेफर्स, बटाट्याटा किस, बटाट्याचे पापड किंवा साबुदाण्याच्या पापड्या असे काही ना काही असतेच. हेच वाळवणाचे घटक आपण तेल किंवा तूपामध्ये तळून त्याचा नैवेद्य दाखवता येतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचे असते.
३. खजूर, राजगिरा वडी-लाडू
पोटाला हलके, आरोग्यासाठी चांगले आणि वाटायला सोपे असे खजूर, राजगिऱ्याचे लाडू किंवा वड्या या गोष्टी प्रसादाला केव्हाही चांगल्या. यामध्येही आता राजगिऱ्याची गुडदाणी, गुलकंद घातलेल्या वड्या किंवा खजूर रोल, खजुराचे लाडू असे बरेच प्रकार मिळतात. आवडीनुसार काहीही आणले तरी वाटायलाही सोपे पडते.
४. फळं
फळं म्हणजे बाजारात सहज उपलब्ध असणारी गोष्ट. अगदी केळ्यांपासून ते सफरचंद, पेरु, पेअर, संत्री, मोसंबी यांसारखी कोणतीही फळं आपल्याला नैवेद्य म्हणून ठेवता येऊ शकतात. रोजच्या धावपळीत आपल्याकडून फळं खाल्ली जातातच असं नाही पण नैवेद्याला ठेवली तर ती आवर्जून खाल्लीही जातात.
५. दाण्याचे, सुकामेव्याचे लाडू
दाण्याचा कूट आपल्या घरात अगदी सहज उपलब्ध असतो. गूळ, दाणे आणि तूप यांपासून केले जाणारे हे लाडू देवीच्या नैवेद्याला उत्तम पर्याय ठरतात. याशिवाय आवडीप्रमाणे यामध्ये सुकामेवा घातला तर त्याची पौष्टीकता आणखी वाढते.