Join us  

कांदे-बटाटे एकत्र ठेवताय? सोय म्हणून ठीक असलं तरी आरोग्यासाठी ते योग्य नाही कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2023 4:43 PM

Never Store Onion and Potato's Together : गोष्ट छोटीशी असली तरी ती महत्त्वाची असल्याने त्याकडे लक्ष द्यायला हवे.

स्वयंपाक करणे एकवेळ सोपं काम आहे पण किचनमधल्या बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देणे हे त्याहून खूप मोठे काम असते. बाजारातून आणलेल्या भाज्या, फळे वेळच्या वेळी साफ करुन नीट स्टोअर करणे, ठराविक वेळात ती संपवणे याकडे आवर्जून लक्ष द्यायला लागते. त्यातही कुटुंबातील सगळ्यांना जास्तीत जास्त पोषण मिळेल असा आहार देणे ही घरातील स्त्रिची मुख्य जबाबदारी असते. यासाठी महिला सतत झटत असतात. सगळ्यांचा चहा, नाश्ता, २ वेळचे जेवण आणि मधल्या खाण्याची सोय करता करता त्या अक्षरश: थकून जातात. काही वेळा ऑफीसचा ताण, सणवार, आजारपणं या गडबडीत काही गोष्टी हातातून राहून जाण्याची शक्यता असते (Never Store Onion and Potato's Together). 

कांदे-बटाटे हे आपल्याला अगदी नियमित लागणारी गोष्ट. कोणत्याही भाजीचं वाटण करायचं असो अथवा एखाद्या पदार्थाला कडका द्यायचा असो आपल्याला कांदे लागतातच. तसेच एखाद्या भाजीत भर घालण्यासाठी नाहीतर एखादा छानसा पदार्थ बनवण्यासाठी बटाटेही लागतात. उपवास असले की तर बटाटे आवर्जून आणले जातात. हे बटाटे आणि कांदे नीट ठेवले तर ठिक नाहीतर कांदे काहीवेळा सडण्याची शक्यता असते. तर बटाट्यांना मोड येतात नाहीतर तेही सुरकुतून खराब होतात. यासाठी कांदे आणि बटाटे वेगवेगळे ठेवायला हवेत. ट्रॉलीमध्ये किंवा २ वेगळ्या बास्केटमध्ये कांदे-बटाटे ठेवले तर ते चांगले राहण्यास आणि जास्त दिवस टिकण्यास मदत होते. घाईच्या वेळी आपण किंवा घरात काम करणाऱ्या बाईने असे मोड आलेले किंवा थोडेसे वास येणारे कांदे किंवा बटाटे वापरले तर ते आरोग्यासाठी अजिबात चांगले नसते हे वेळीच लक्षात घ्यायला हवे. 

कांदे-बटाटे एकत्र ठेवल्याने नेमकं काय होतं?

कांद्यातून अतिशय जास्त प्रमाणात इथेलिन गॅसची निर्मिती होते. ही नैसर्गिक क्रिया असल्याने त्यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. बटाटे आणि कांदे एकत्र ठेवले असतील तर या गॅसमुळे बटाटे पिकल्यासारखे होतात आणि त्यांना मोड येण्यास सुरुवात होते. त्यामुळे प्रत्यक्ष आपल्याला जेव्हा बटाटे वापरावे लागतात तेव्हा ते लवकर खराब होतात.  तसेच बटाट्यांमध्ये असणारी आर्द्रता कांद्यांसाठी चांगली नसते. त्यामुळे कांदे मऊ पडण्याची किंवा सडण्याची शक्यता असते. म्हणूनच या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवलेल्याच केव्हाही जास्त चांगल्या. 

टॅग्स :सोशल व्हायरलकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सआरोग्य