Join us  

लेक झोपेतून उठली तर तिच्यासाठी पंतप्रधानांनी थांबवले फेसबुक लाइव्ह! आधी लेक, मग काम..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2021 5:03 PM

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा (Jacinda Ardern) यांचा एक व्हिडियो सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. मुलीसाठी त्यांनी जे केलं त्यावर काही लोक सडकून टिका करत आहेत, तर काहींना त्यांच्या मातृत्वाचं कौतूक वाटत आहे. 

ठळक मुद्देआईची माया, आईचं प्रेम याला काही तोड नाही, त्याचं कोणतंही मोल नाही हेच जेसिंडा यांनी न बोलता सांगितलं. 

जेसिंडा अर्डर्न.... न्यूझीलंडच्या सगळ्यात तरूण पंतप्रधान. त्यांनी आज त्यांच्या ३ वर्षाच्या मुलीसाठी कमाल केली. कोविडमुळे अनेक जणींनी घरून काम करण्याचा अनुभव घेतला आहे. किंवा काही जणी अजूनही घरून काम करत आहेत. अशावेळी एखादी ऑफिसची महत्त्वाची मिटिंग सुरू असेल आणि त्यावेळी नेमकी मुलं मध्ये मध्ये करत असतील, तर आपण मुलांवर खूप चिडतो. कारण सगळ्यांसमोर आपल्या मुलांनी असं मध्ये- मध्ये करणं आपल्याला आवडत नाही. झटकन कॅमेरा बंद करतो आणि मुलांना शांत करण्याचा प्रयत्न करतो. काही जणींसाठी ही परिस्थिती तर खूपच लाजिरवाणी असते. असंच काहीसं न्यूझीलंडच्यापंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांच्यासोबत पण झालं. पण त्यांनी अशा वेळी जे काही केलं त्यामुळे अनेक जण खूप आश्चर्यचकीत झाले.

 

'घार फिरे आकाशी, लक्ष तिचे पिलापाशी...' या म्हणीचा खरा अर्थ न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा यांच्या वागण्यातून नुकताच आला. काम, मिटिंग हे सगळं नंतर... आधी मी एक आई आहे.. अशी त्यांनी घेतलेली भूमिका आज जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. तर त्याचं झालं असं की, न्यूझीलंडच्या प्रधानमंत्री जेसिंडा तेथील सर्व संसद सदस्यांची मिटिंग घेत होत्या. मिटिंग ऑनलाईन होती अणि जेसिंडा ती फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून घेत होत्या. त्यावेळी त्या त्यांच्या घरातच होत्या.

मिटिंगचा विषय अत्यंत गंभीर होता. देशातली कोरोनाची सध्याची परिस्थिती, मृतांची आकडेवारी, लॉकडाऊन आणि त्याविषयीची चर्चा अशी सगळी तणावपूर्ण विषयांवर आधारीत ही मिटिंग होती. मिटींग ऐन भरात आली आणि तेवढ्यात जेसिंडा यांच्या बाजूने 'मम्मी....' असा आवाज आला. जेसिंडा यांची ३ वर्षांची मुलगी त्यांच्या बाजूला उभी राहून त्यांना हाका मारत होती.

 

मुलीची हाक ऐकून त्या म्हणाल्या “You’re meant to be in bed, darling... It’s bedtime, Pop back to bed, I’ll see you in a second,” बेटा आता यावेळी तु झोपायला हवं आहेस... तु झोप मी येतेच थोड्या वेळात असं म्हणून त्यांनी मुलीला जायला सांगितलं. त्यानंतर त्या पुन्हा मिटिंगला जॉईन झाल्या. मुलीशी ही सगळी चर्चा त्यांनी कॅमेरा आणि माईक सुरू ठेवूनच केली. ही परिस्थिती त्यांनी अगदी हळूवारपणे सांभाळली. मुलगी गेल्यानंतर त्या हसत हसत म्हणाल्या की हा तिचा बेडटाईम होता, पण तो फेल गेला असं म्हणावं लागेल... तुम्हालाही असाच अनुभव येतो का की मुलं झोपतात आणि ३- ४ वेळा उठतात... 

 

यानंतर त्यांनी मिटिंगवर पुन्हा एकदा फोकस केलं, पण त्यानंतर काही मिनिटांतच मुलीची हाक पुन्हा एकदा ऐकू आली.. मुलीची हाक ऐकताच त्या पुन्हा एकदा आईच्या भूमिकेत गेल्या. “ओके बेटा मला माहिती आहे की ही मिटिंग खूपच जास्त लांबत चालली आहे, तु जाऊन झोप मी येतेच.... ” असं म्हणत त्यांनी मिटिंगला उपस्थित असणाऱ्या सदस्यांची क्षमा मागितली आणि मुलीला झोपविण्यासाठी त्यांनी मिटिंग लेफ्ट केली. पंतप्रधान असले तरी सगळ्यात आधी मी एक आई आहे.. असेच जणू त्यांनी त्यांच्या या कृतीतून न बोलता सांगितले.

 

पंतप्रधानात पदाखाली दडलेल्या एका आईने घेतलेली ही भूमिका पाहून सोशल मिडियावर जेसिंडा यांचे भरभरून कौतूक होत आहे. तर दुसऱ्या बाजूने त्यांच्यावर सडकून टिकाही केली जात आहे. टिका करायची की कौतूक हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण आईची माया, आईचं प्रेम याला काही तोड नाही, त्याचं कोणतंही मोल नाही हेच जेसिंडा यांनी न बोलता सांगितलं.  

टॅग्स :सोशल व्हायरलन्यूझीलंडपंतप्रधानफेसबुक