Join us  

सिमेंट - विटा नाहीच, तांदळाचा भुसा आणि चुना वापरुन बांधलं घर, हे घर पाहिलंय का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2022 2:53 PM

जुन्या वळणाचं पण आधुनिक सोयी सुविधांनी युक्त असं इकोफ्रेंडली घर म्हणजे स्वप्नच.. ते सत्यातही उतरवता येतं ?

ठळक मुद्देसिमेंट विटा यांचा वापर टाळून माती आणि तांदळाचा भुसा, हिरडा, मेथ्या यांची पूड, गूळ यांचा वापर केलेला आहे. भिंतींसाठी लेटराइट नावाच्या दगडाचा वापर केलेला आहे. घरातल्या बहुतांश भिंती प्लास्टरशिवाय ठेवलेल्या असल्यानं घराच्या नैसर्गिक सौंदर्यात भर पडली आहे. 

घर घ्यायचं, बांधायचं म्हटलं की आधुनिक सोयी सुविधा असलेलं मार्डन लूकचं घर हवं अशी प्रत्येकाची इच्छा असते. दगड मातीची घरं गाव खेड्यात देखील आता विरळ प्रमाणात उरली आहे. गाव खेड्यातली घरं विटा सिमेंटचं अंगं लेवून आधुनिक झाली आहे. त्यामुळे गाव खेड्यांचं चित्रंही बदललं आहे. पण आजच्या आधुनिक काळात एका इंजिनिअर असलेल्या व्यक्तिने पारंपरिक शैलीचं, गाव खेड्यातल्या घरासारखं घर करायचं ठरवलं. सिमेंट विटांचा वापर न करता जुन्या रुपाचं पण सर्व आधुनिक सोयी सुविधा असलेलं घर साकारायचं ठरवलं. केरळमधील त्रिचूर येथे इंजिनिअर असलेल्या दिनेश कुमार यांनी स्वत:चं घर करायचं ठरवलं तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर पारंपरिक गाव खेड्यातल्या घरांची वास्तुरचना होती. मनात या स्वरुपाच्या घरात शिरल्यावर मिळणारा थंडावा होता. पर्यावरणाला धक्का न लावता नैसर्गिक घटकांचा वापर करुन बांधलेलं दिनेश कुमार यांचं घर केवळ डोळ्यांसाठी देखणं नाही तर मनाला आल्हाद देणारं झालं आहे. आज त्यांचं घर लोकांना फक्त आवडतं असं नाही तर पाहाणारे या घराच्या प्रेमात पडत आहे. 

Image: Google

300 यार्डाच्या जागेत  4 बेडरुम , एक स्वयंपाकघर, जेवणासाठीची खोली, देवघर, बाल्कनी आणि बहुपयोगी जागा, मध्ये मध्ये अंगण  असलेले केरळमधील  दिनेश कुमार यांचं देखणं  साकारलेलं आहे.  दिनेश कुमार यांच्या स्वप्नातलं घर तयार करण्यासाठी केरळमधील 'ग्रामीण विकास केंद्रा'त डिझायनर आणि इंजिनअर असलेल्या शांतिलाल यांनी प्रत्यक्ष काम केलं. पारंपरिक वास्तुरचनेसाठी शांतिलाल यांनी घराच्या भिंतीसाठी सिमेंट विटांचा वापर न करता  त्यांनी लेटराइट या दगडाचा वापर केला. लेटराइट हे दगड केरळ येथील पारंपरिक वास्तुरचनेचा महत्त्वाचा भाग आहे. सिमेंट ऐवजी या घरासाठी वाळू , चुना यासोबतच तांदळाचा भुसा, गूळ, मेथ्या , हिरडा यांची पूड या नैसर्गिक गोष्टींचा वापर केला गेला. नदीतील माती आणि वाळू याचा वापर मात्र यात केला नाही.

Image: Google

प्लास्टरसाठी तांदळाचा भुसा, गूळ, मेथ्या, हिरड्या यांच्या भुशाचा वापर केल्यानं भिंती पोखरण्याचा धोका टाळला गेला. या नैसर्गिक घटकांमुळे घराच्या भिंती देखण्या झाल्या आहेत.  स्वयंपाकघर आणि बाथरुमच्या ठिकाणी पाण्याचा वापर होत असल्यानं तिथे सिमेंटचं प्लास्टर केलं गेलं. घरातल्या काही भिंती प्लास्टरशिवाय त्यांच्या मूळ रुपात ठेवल्या गेल्यात. यामुळे घराच्या नैसर्गिक सौंदर्यात भर पडली. शांतिलाल यांनी जिथे सिमेंटचं प्लास्टर केलं त्या ठिकणी मातीच्या टाइल्स लावल्या. 

Image: Google

नैसर्गिक घटकांचा वापर करुन तयार केलेल्या दिनेश कुमार यांच्या घरात जुन्या घरातल्यासारखा थंडावा मिळतो. त्यामुळे त्यांना पंख्याचा वापरही फार कमी करावा लागतो. तसेच  घरात नैसर्गिक प्रकाश यावा यासाठी मध्ये मध्ये अंगण केलं असून छताला जाळ्या लावल्या आहे. या जाळ्यांमधून घरभर प्रकाश पसरतो. घराच्या भिंतींना वाॅटर बेस्ड रंग लावला आहे. घरातल्या बाल्कनीला लावलेल्या स्टीलच्या ग्रीलला त्या लाकडी दिसतील अशा पध्दतीन्ं त्यांना रंगवलं आहे.  

Image: Google

घराच्या खिडक्या दरवाजांसाठी लाकडाचा वापर केला आहे. ही लाकडं म्हैसूर येथून मागवली असून ती जुनी लाकडं आहेत. मोठं स्वयंपाकघर, स्टडी, मंदिर  अशी बहुपयोगी बाल्कनी हे दिनेश कुमार यांच्या घराचं आणखी एक वैशिष्ट्यं.

 

दिनेश कुमार यांच्ं जुन्या वळणाचं आधुनिक सोयी सुविधा असलेलं देखणं घर पाहिलं की ते खूप महागात गेलं असेल असं वाटतं. पण दिनेश कुमार यांना हे इकोफ्रेंडली घर साकारण्यासाठी 35 लाख एवढा खर्च आला आहे. हा खर्च ऐकून  खिशाला परवडणारं घर म्हणूनही दिनेशकुमार यांच्या घराची चर्चा केवळ आजूबाजूलाच नाही तर देशभरातल्या माध्यमांमध्ये होत आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलसुंदर गृहनियोजनकेरळ