झुरळं ही उन्हाळ्याच्या दिवसांत अनेक घरांमधील एक महत्त्वाची समस्या असते. कितीही साफसफाई केली तरी ट्रॉलीमध्ये किंवा अगदी ओट्यावर फिरणारी झुरळं पाहून आपल्याला नकोसं वाटतं. कधी सिंकच्या खाली तर कधी सिलिंडरपाशी नाहीतर अगदी भांड्यांमधून फिरणारी ही झुरळं फार वैताग आणतात. सुरुवातीला २ किंवा ४ इतक्या संख्येत असणाऱ्या या झुरळांची संख्या काही दिवसांत अचानक दुप्पट-तिप्पट होते आणि ते दिवस रात्र आपल्या किचनचा ताबा घेतल्याप्रमाणे इकडून तिकडे फिरत राहतात. झुरळं झाली म्हणून आपण सतत घराची साफसफाई करतो. पण इतकं करुनही ही झुरळं घर सोडण्याचं नाव घेत नाहीत. खायच्या पदार्थांवर, भांड्यामध्ये फिरणारी झुरळं पाहून आपल्याला किळस तर येतेच पण त्यापेक्षाही अशाप्रकारे खाण्या-पिण्याच्या गोष्टींवर झुरळांचा वावर आरोग्यासाठीही धोकादायक ठरु शकतो. उन्हाळ्याच्या दिवसांत थंडाव्यासाठी येणाऱ्या या झुरळांचा बंदोबस्त कसा करायचा यासाठी काही सोपे आणि सहज करता येतील असे उपाय पाहूया....
१. बेकींग पावडर आणि साखर समप्रमाणात घेऊन हे मिश्रण एकत्र करुन घरातील कोपऱ्यांमध्ये ठेवावी. खासकरुन ज्या ठिकाणी अंधार आणि ओलावा आहे अशा जागेवर झुरळे फिरण्याचे प्रमाण जास्त असते. अशाठिकाणी ही पावडर टाकल्यास झुरळे मरण्यास किंवा घराबाहेर जाण्यास मदत होते.
२. झुरळांना वास खूप लवकर येत असल्याने ते वासाच्या दिशेने जातात. यासाठी घरात झुरळ फिरत असलेल्या ठिकाणी कडूलिंबाच्या पानांचे तेल किंवा पावडर टाकावी. कडूलिंबाच्या पानांमध्ये असलेल्या उग्र वासामुळे झुरळे लवकर मरतात. त्यामुळे झुरळांपासून सुटका करण्यासाठी हा एक उत्तम उपाय ठरु शकतो.
३. हल्ली बाजारात झुरळांना मारण्यासाठी एकप्रकारचा खडू किंवा पावडर मिळते. स्वयंपाकघरात ओटा, ट्रॉली, फ्रिजच्या आसपास, सिंक अशा ज्याठिकाणी झुरळे असतील त्याठिकाणी हा खडू मारावा किंवा पावडर टाकावी. त्यामुळे झुरळे मरतात. शक्यतो रात्री झोपताना हे केल्यास रात्रीच्या वेळात त्यांचा बंदोबस्त होऊ शकतो. पण ही पावडर किंवा खडू विषारी असल्याने दुसऱ्या दिवशी हे सगळे अतिशय बारकाईने साफ करणे गरजेचे असते.
४. किचन जास्तीत जास्त स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी. ट्रालीमध्ये किंवा बंद कपाटांमध्ये हवा लागेल यासाठी ही कपाटे आणि ट्रॉली रात्रीच्या वेळी उघडून ठेवाव्यात. दमट ठिकाणी झुरळे जास्त लवकर होत असल्याने किचन दमट राहणार नाही याची काळजी घ्यावी. सिंकच्या आसपास खरकटी भांडी, ओल, खरकटे असे असल्याने याठिकाणीही झुरळे जास्त प्रमाणात होतात. ही जागा जास्तीत जास्त साफ ठेवण्याचा प्रयत्न करावा. सिंकच्या खाली न लागणारे बरेच सामान आपण ठेवलेले असते. ते शक्यतो वेळच्या वेळी काढून फेकून द्यावे. कारण अशा पिशव्या, डबे, कचरा यांमध्ये झुरळे राहतात आणि लवकर वाढतात.