बाहेर जाताना कपडे घालायचे असो किंवा एखादे कानातले. आपल्या कपाटात वेळेला काही सापडेल तर नवल. इतकेच काय पण कपाटाचं दार उघडलं की त्यात दबा धरुन बसलेले कपडे एकदम आपल्या अंगावर येतात आणि मग घाईत असल्याने आपण हे महागडे कपडे उचलतो आणि ज्या पद्धतीने ते खाली आले त्याच पद्धतीने आत कोंबून टाकतो. क्लोसेट ऑर्गनायझर किंवा वॉर्डरोब मॅनेजर म्हणून हल्ली काही जण काम करताना दिसतात. आपल्या कपाटात काय, कसे असेल आपण कधी कोणत्या गोष्टी खरेदी करायला हव्यात, त्या कशा ठेवायला हव्यात यांबद्दल ते आपल्याला गाईड करतात. मोठमोठे अभिनेते किंवा अभिनेत्री, उद्योजक, राजकीय नेते यांच्यासाठी हे ठिक आहे. पण आपले कपाट आपल्यालाच सजवावे आणि आवरावे लागते. मात्र कितीही वेळा आवरलं तरी आपल्या कपाटाची होणारी (Tips for wardrobe organising) ही अवस्था नवीन नाही. आपल्याच काय पण आपण आवरुन ठेवलेल्या घरातील इतरांच्याही कपाटाचीही हिच अवस्था होते. सकाळी घाईच्या वेळी ऑफीसला किंवा एखाद्या कार्यक्रमाला जाताना आपल्याला पटकन हवे ते कपडे मिळावेत यासाठी कपड्यांची योग्य पद्धतीने मांडणी केलेली केव्हाही चांगली. याबरोबरच कितीही घाईत असलो तरी कपडे काढण्याची आणि ठेवण्याची पद्धत योग्य असेल तर कपाट सारखे अस्ताव्यस्त होणार नाही. पाहूयात यासाठीच्या काही सोप्या टिप्स...
१. कपड्यांचे वर्गीकरण करा
कपाटात कपडे लावताना त्यांचे योग्य पद्धतीने वर्गीकरण केलेले असेल तर विशिष्ट वेळेला विशिष्ट ठिकाणी जाताना आपल्याला ते कपडे पटकन सापडायला मदत होते. आपल्या कपाटाला लहान आकाराचे कप्पे असल्यास हे काम आणखी सोपे होते. यामध्ये एका कप्प्यात घरात घालायचे कपडे, एका कप्प्यात जीन्स किंवा पँट आणि ट़ॉप ठेवता येतात. दुसऱ्या कप्प्यात कुर्ते आणि लेगिन्स यांचे गठ्ठे करुन ठेवता येतात. याशिवाय आणखी एका कप्प्यात किंवा एखाद्या बॉक्समध्ये पंजाबी ड्रेस ठेवता येतात. त्याचप्रमाणे साड्यांसाठीही हल्ली बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे अतिशय चांगले असे बॉक्स मिळतात. त्यामुळे आपण साड्या ठेवू शकतो. ट्रीपला जाण्यासाठीचे काही वनपीस, शॉर्टस, थ्री फोर्थ पँट असतील तर त्या आपण एरवी वापरत नाही त्यामुळे साड्या ज्याप्रमाणे नेहमी लागत नाहीत अशाठिकाणी ठेवतो तसेच हेही कपडे ठेवा. त्यामुळे ट्रीपला जाण्याच्यावेळी हे कपडे पटकना सापडण्यास मदत होईल.
२. आतल्या कपड्यांसाठी वेगळी जागा ठेवा
आतले कपडे, काही कपड्यांच्या आत घालण्यासाठी त्यावरील मॅचिंग स्लिप, वेगळ्या प्रकारच्या ब्रेसियर, स्लॅक्स यांसारखे बरेच कपडे असतात. हे कपडे ठेवण्यासाठी कपाटातील एखादा कोपरा किंवा एखादा न लागणारा साडी बॉक्सही आपण वापरु शकतो. त्यामुळे ऐनवेळी एखादी स्लिप किंवा वेगळ्या प्रकारची ब्रेसियर आपल्याला लागत असेल तर ती मिळणे सोपे जाते. कपाटाला एखादा ड्रॉवर असेल तर त्याचाही हे कपडे ठेवण्यासाठी चांगला उपयोग होऊ शकतो.
३. अडकवून ठेवता येतील अशा कपड्यांसाठी सोय करा
थंडीच्या दिवसांत लागणारे स्कार्फ, टोप्या, जीन्सला लावायचा बेल्ट, वेगवेगळ्या प्रकारचे जॅकेटस, श्रग यांसारख्या गोष्टी अडकडून ठेवल्या तरी चालतात. त्यामुळे कपाटाच्या आत किंवा त्याच्या दाराला काही हूक लावल्यास या गोष्टी अडकवणे सोपे जाते आणि बाहेर निघताना आपल्याला विशिष्ट गोष्ट हवी असल्यास ती पटकन डोळ्यासमोर येते.
४. कपड्यांचे सेट जवळ राहतील असे बघा
साडीवरील ब्लाऊज-परकर यांचा सेट, कुर्त्यावरील लेगिन्स, जीन्सवरील टॉप हे एकमेकांवर घालण्याचे कपडे एकमेकांसोबत किंवा किमान जवळ राहतील याची काळजी घ्या. म्हणजे ऐनवेळी त्यांची शोधाशोध करावी लागणार नाही. अनेकदा एखादा कुर्ता घालायचा असतो पण त्यावरील लेगिन्स काही केल्या मिळत नाही. एखादी पँट आपण घालायला काढतो पण त्यावर जाईल असा नेमका टॉप किंवा टीशर्ट ऐनवेळी सापडतच नसतो. त्यामुळे बाहेर निघताना आपली धांदल होते आणि मग घाईघाईत कपाट हाताळल्याने त्याची पूर्ण अवस्था होऊन जाते. त्यामुळे ज्यावर जे घालायचे आहे ते एकमेकांच्या जवळ ठेवलेले केव्हाही चांगले.
५. धुवायचे, इस्त्रीचे, दुरुस्तीच्या कपड्यांचे वर्गीकरण करा
वापरुन झालेले धुवायला घेण्याचे, धुतलेले इस्त्रीला टाकण्याचे आणि इस्त्रीहून आलेले पुन्हा कपाटात ठेवण्याचे कपडे यांचेही योग्य पद्धतीने नियोजन झालेले केव्हाही चांगले. यातही बटण, हुक निघालेले, चेन खराब झालेले, उसवलेले कपडे वेगळे ठेवायला हवेत. म्हणजे वीकेंडच्या दिवशी आपण शक्य असेल तर घरात नाहीतर बाहेरुन त्यांची दुरुस्ती करुन आणू शकतो. आठवडाभराचे नियोजन चांगेल असेल तर ऐनवेळी आपली धांदल उडणार नाही, त्यामुळे आठवड्याचे ५ किंवा ६ दिवस लागतील असे कपडे आधीच धुवून व्यवस्थित इस्त्री करुन रविवारी बाजूला काढून ठेवावेत. म्हणजे वेळ वाचण्यास मदत होते.