आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या आई-वडिलांसाठी लहानच असतो. मग आपली नोकरी, हुद्दा आणि पगार कितीही असला तरी आई-वडिलांनी दिलेले एखादे गिफ्ट किंवा खाऊ याची जागा कोणतीही गोष्ट घेऊ शकत नाही. आपल्या घरापासून आणि आईपासून दूर राहणाऱ्यांना याची किंमत नक्कीच जास्त असेल. घरातून निघताना आईने मायेने हातात ठेवलेले पैसे हे पैसे नसून प्रेम असते हे कोणी वेगळे सांगायला नको. हाच अनुभव आयएएस ऑफीसर असलेल्या एका तरुणीने नुकताच घेतला. संजना यादव या आयएएस ऑफीसर आहेत. ऑफीसर म्हटल्यावर त्यांना कोणत्या राज्यातली किंवा शहरातील नियुक्ती मिळेल सांगता येत नाही. पण सुट्टीसाठी घरी गेल्या असताना घरुन निघताना त्यांच्या आईने त्यांच्या हातात ५०० रुपयांची नोट दिली.
अच्छी खासी सैलरी है मेरी फिर भी घर से निकलते वक्त #माँ ने जबरदस्ती मेरे हाथ में 500 रुपए दे दी !#माँ❤️
— Sanjana Yadav IAS🇮🇳 (@SanjanaYadavIAS) December 18, 2021
ही गोष्ट त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली असून त्या म्हणतात, चांगली सॅलरी आहे पण आईने घरातून निघताना जबरदस्ती ५०० रुपये दिलेच. आता आयएएस ऑफीसर म्हटल्यावर त्यांचा पगार चांगला असणारच पण आईने प्रेमाने आशिर्वाद म्हणून दिलेल्या ५०० रुपयांची सर कोणत्याही गोष्टीला येणार नाही. त्यांच्या या ट्विटला नेटीझन्सनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी त्यावर आईच्या प्रेमाविषयी भाष्य केले आहे. युजर्स म्हणतात आपण कितीही मोठे झालो तरी आईचे प्रेम कायम तसेच राहते. तर हे पैसे नसून आशिर्वाद असल्याचेही अनेकांनी म्हटले आहे. आपली सगळी सॅलरी आणि लाखो-करोडो रुपये एकीकडे आणि आईने दिलेले पैसे एकीकडे असेही एकाने त्यावर म्हटले आहे.
वो आशीर्वाद है सिर्फ रुपए नहीं।।
— Giri (@giri833201) December 18, 2021
अशावेळी दिवार चित्रपटातील अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्या तुम्हारे पास क्या है? असे विचारल्यावर, मेरे पास माँ है हे सांगणाऱ्या संवादाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. संजना या २०१९ च्या बॅचमध्ये युपीएसी परीक्षा पास झाल्या. त्याआधी त्यांनी २ वेळा प्रयत्न केला होता मात्र पूर्ण वेळ नोकरी करुन अभ्यास करत असल्याने त्यांना अपेक्षित यश मिळाले नव्हते. २०१९ मध्ये मात्र त्यांना १२६ वी रॅंक मिळाली. विशेष म्हणजे इतका अभ्यास आणि तयारीसाठी त्यांनी कोणतेही क्लासेस न लावता घरच्या घरी स्वत: कष्ट घेत तयारी केली आणि हे यश संपादन केले.