हो खरंच आहे. इडेबल साडी नावाचा भन्नाट प्रकार केरळ येथील एका २४ वर्षीय तरूणीने तयार केला आहे. ॲना एलिझाबेथ जॉर्ज असं त्या तरूणीचं नाव. केक बनवणं आणि फ्लॉवर डेकोरेशन हे ॲनाचं पॅशन. एकदा तिच्या आईने एक साडी नेहमीप्रमाणे धुतली आणि वाळत घातली. ते पाहून ॲनाला एक युक्ती सुचली आणि लगेचच ती कामाला लागली. तिचं काम जेव्हा पुर्णत्वाला आलं होतं, तेव्हा तयार झाली होती एक आश्चर्यकारक गोष्टी. ती म्हणजे चक्क खाता येईल अशी गोड साडी. कसं केलं ॲनाने हे, कसं शक्य झालं तिला हे सगळं?
ॲना जॉर्जला केक बनवणं आणि फ्लॉवर डेकोरेशन या गोष्टी प्रचंड आवडतात. पण म्हणून ते काही तिचं करिअर नाही. ॲना सध्या कॅन्सर आणि न्यूरोबायोलॉजी या विषयात डॉक्टरेट करते आहे. ॲनाच्या आईचे वडील जेकाेब हे खूप उत्तम केक बनवायचे. ॲनाने तिच्या आजोबांकडूनच केक बनविण्याचं प्रशिक्षण घेतलं आणि त्यांच्यामुळेच तिला केक बनविण्याची गोडी लागली. सध्या ॲनाने केरळमध्ये जेकोब केक्स आणि जेकोब फ्लॉरल असे दोन व्यवसायही सुरू केले आहेत. तर अशा या ॲनाला दरवर्षी ओनम सणानिमित्त काही तरी वेगळं करण्याची इच्छा असते आणि ती ते करतेही.
यावर्षी ॲनाने ओनम निमित्त खाता येईल अशी साडी बनवून सगळ्यांनाच अचंबित केले आहे. याविषयी सांगताना ॲना म्हणाली की ही साडी १०० टक्के इडेबल आहे आणि खाता येईल अशी ही जगातील कदाचित एकमेव साडी असावी असंही ॲनाला वाटतं. या साडीसाठी ॲनाला तब्बल ३० हजार एवढा खर्च आला आहे. पण ॲना म्हणाली की मी अशाप्रकारचा प्रयोग पहिल्यांदाच करत होते. त्यामुळे ही साडी तयार करताना खूपदा चुकले. यामध्ये अनेकदा सामान वाया गेले. हा सर्व खर्च जर एकत्रित केला तर अंदाजे ३० हजार रूपये तिला ही साडी तयार करण्यासाठी लागले. पण आता मात्र तिला अशी साडी तयार करण्याचा अंदाज आला असून आता ती ग्राहकांना अशाच प्रकारची साडी १० हजार रूपयांमध्ये देऊ शकते. ही साडी जर एखाद्या खऱ्या खुऱ्या साडीच्या बाजूला ठेवली तर नेसण्याची साडी कोणती आणि खाण्याची साडी कोणती, हे देखील कळणार नाही, एवढं सुबक काम या साडीवर करण्यात आलं आहे.
आहे कशी ही साडी?
केरळच्या पारंपरिक कसावू साडीसारखी साडी ॲनाने तयार केली आहे. ही साडी पांढऱ्या रंगाची असून त्यावर सोनेरी रंगाने काम करण्यात आले आहे. या साडीसाठी तिने स्टार्च बेस वेफर पेपर वापरला आहे. बटाटे आणि तांदूळ यांच्यापासून हा स्टार्च तयार झाला आहे. या साडीसाठी ॲनाने १०० वेफर पेपर वापरले असून एका पेपरचा आकार अंदाजे एखादा ए- ४ पेपर जेवढा असतो, तेवढा आहे. गोल्ड डस्ट लश्चर वापरून तिने साडीवरचं जरी काम आणि काठाचं काम केलं आहे. ५.५ मीटरची ही साडी तिने घरात पसरून ठेवली आहे.
साडी बनविण्याची कल्पना डोक्यात आल्यापासून ते प्रत्यक्षात साडी तयार होईपर्यंत दिड महिन्याचा कालावधी लागला. तर साडी तयार करण्यासाठी दिड आठवडा लागला. ही साडी दोन किलो वजनाची असून ती प्रत्यक्षात साकारताना अनेक प्रयोग करून पहावे लागले, असे ॲना सांगते.