पोळ्या करणे हे महिलांसाठी रोजचेच एक मोठे काम असते. कणीक मळणे, पोळ्या लाटणे, त्या भाजणे अशा सगळ्या प्रक्रियेमध्ये सकाळ-संध्याकाळचा बराच वेळ जातो. घरात जास्त माणसे असतील तर पोळ्या करुन महिलांची दमछाक होते. मग कधी पोळ्यांना बाई लावणे किंवा आदल्या दिवशीच कणीक मळून ठेवणे असे उपाय शोधले जातात. गेल्या काही वर्षात कणीक मळण्यासाठी फूड प्रोसेसर, रोटी मेकर असे पर्य़ाय उपलब्ध झाल्याने काही स्त्रियांचे काम सोपे झाले आहे. पण तरी आपल्याला कणीक मळण्यापासून ते तयार पोळी बाहेर येण्यापर्यंत सगळी प्रक्रिया होणारे एक मशीन बाजारात आले आहे असे कोणी म्हटले तर आपण अतिशय घाईने या मशीनचा शोध घेऊ.
पण प्रत्यक्षात आपण हे मशीन खरेदी करु की नाही सांगता येत नाही. कारण या मशीनमुळे कामाचा ताण हलका होणार असला तरी खिशाला कात्री लागणार आहे. त्यामुळे या मशीनची संकल्पना अतिशय उत्तम असली तरी त्याची किंमत खूपच जास्त आहे. त्याच्या अव्वाच्या सव्वा किमतीमुळे या मशीनला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले आहे. या मशीनची किंमत तब्बल १ लाख रुपयांहून जास्त असल्याने त्यावर सोशल मीडियावर बऱ्याच कमेंटस करण्यात आल्या आहेत. रोटीमॅटीक असे या मशीनचे नाव असून त्याला रोबोटीक मशीन म्हटले जाते. म्हणूनच हे मशीन सोयीचे असले तरी सामान्यांना परवडणारे निश्चितच नाही.
पीठ टाकल्यानंतर पीठ मळणे, पोळ्या लाटणे, पोळ्या भाजणे अशी सर्व कामे या मशीनव्दारे करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे यामध्ये मसाला पोळी, पुऱ्या, पिझ्झाचा बेस हेही सगळे करता येईल. मात्र या मशीनची किंमत अव्वाच्या सव्वा असल्याने सोशल मीडियावर त्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. मशीनला इतके पैसे मोजण्यापेक्षा आम्ही घरी पोळ्या बनवू. एकाने म्हटले आहे पत्नीशा घटस्फोट हवा असेल तर हे मशीन खरेदी करा. या मशीपेक्षा आम्ही पोळ्या कशा करायच्या ते शिकू आणि हाताने पोळ्या करु असेही एकाने म्हटले आहे. तर लग्न न करता हे मशीन खरेदी करा तुमचा मंडपाचा खर्च वाचेल असेही एकाने चेष्टेने म्हटले आहे. त्यामुळे या पोळी बनवण्याच्या मशीनवरुन सोशल मीडियावर नेटीझन्समध्ये चर्चेला उधाण आल्याचे दिसते.