आजकाल कोण कशासोबत कोणता पदार्थ खाईल, हे काही सांगता येत नाही.. म्हणूनच तर कधी पाणीपुरीत मॅगी भरली जाते. तर कधी गुलाबजामचं दही आणि तिखट- गोड चटणी टाकून चाट बनवलं जातं.. आता हेच बघा ना सोशल मिडियावर सध्या गाजत असलेला हा पदार्थही भलताच अतरंगी आहे...चहा सोबत केलेला हा भलतासलता प्रयोग पाहून चहाप्रेमी चांगलेच नाराज झाले आहेत...(fruit chai recipe)
बहुसंख्य भारतीयांना मनापासून आवडणारा पदार्थ म्हणजे गरमागरम वाफाळता चहा.. चहाशिवाय तर आपला दिवसच सुरू होत नाही.. आनंद साजरा करण्यासाठी, दु:ख विसरण्यासाठी, डोकं शांत करण्यासाठी किंवा चांगली तरतरी येण्यासाठी... असा प्रत्येक टप्प्यावर आपल्याला चहा लागतोच लागतो. उन्हाळा असला तरी ठराविक वेळेला गरमागरम चहाची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. म्हणूनच कधी वेलची, कधी आलं तर कधी सुंठ आणि इतर मसाले टाकून चहा प्यायला जातो..
पण इथे तर या विक्रेत्याने चक्क कमालच केली आहे. सुरत शहरात हे गृहस्थ चहा विकत असून त्यांनी जो काही चहाचा प्रकार केला आहे, तो पिण्यासारखा आहे की नाही, हे माहिती नाही. पण बघण्यासारखा मात्र नक्कीच आहे. चहा आणि फळं हे आतापर्यंत कधीही कुणीही विचार न केलेलं कॉम्बिनेशन त्यांनी एकत्र करून चक्क फ्रुट चहा बनवला आहे.
हा व्हिडिओ सध्या यु ट्यूबच्या Foodie Incarnate या पेजवर शेअर झाला आहे. यामध्ये असं दिसतंय की नेहमीप्रमाणे दूध, साखर, चहापावडर, पाणी असे पदार्थ टाकून चहा उकळायला ठेवण्यात आला आहे. चहा करणारे गृहस्थ या चहामध्ये चक्क चिकू, सफरचंद अशी फळं किसून, लहान लहान तुकडे करून टाकत आहेत. असा हा फळांचा चहा उकळल्यानंतर तो गाळणीने गाळून कपात ओतण्यात आला. बघा चहाचा हा प्रकार आवडला असेल तर नक्की करून पहा फ्रुट चहा..