बाहेर जाऊन जेवायचं असेल आणि खूप भूक लागली असेल तर आपण थाळी खाण्याचा पर्याय निवडतो. दोन तीन प्रकारच्या भाज्या, आमट्या, पोळी, भाकरी, चटपटीत स्नॅक्स, गोडाचा पदार्थ, भात, खिचडी, रायतं, कोशिंबीर असं सगळं साग्रसंगीत मिळतं. थाळी हा प्रकार संपूर्ण भारतात प्रसिध्द आहे. पोटभरुन जेवणाचं समाधान मिळतं ते थाळी खाऊन. भारतात वेगवेगळ्या प्रकारच्या थाळी प्रसिध्द आहेत. अशीच दिल्लीत एका हाॅटेलमधे बाहुबली थाळी मिळते. ही थाळी एक दोघांनी संपवणं अशक्यच. ही थाळी पाहून केवळ पोट भरत नाही तर भूक असली तरी खाण्याची इच्छा होणार नाही इतके पदार्थ दाटीवाटीने थाळीत समाविष्ट असतात. पण ही थाळी आपल्या एका मित्राबरोबर संपवण्याचं चॅलेन्ज एकानं स्वीकारलं आणि पूर्णही करुन दाखवलं. ही थाळी संपवणाऱ्यांना थाळीचे पैसे द्यावे लागत नाही तर थाळी पूर्ण संपवल्याचं बक्षिस मिळतं. किती तर आठ लाख रुपये!
Image: Google
दिल्लीतील कनाॅट प्लेस येथील ऑर्डर 2.1 नावाच्या रेस्टाॅरन्टमधे हे बाहुबली थालीचं चॅलेंज ठेवलं गेलं होतं. या थाळीचं चॅलेन्ज कसं पूर्ण केलं याचा व्हिडिओ रजनीश ज्ञानी या फूड ब्लाॅगरने युटूबवर टाकला असून तो चांगलाच व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत रजनीश आपल्या मित्रासोबत बाहुबली थाळीचं चॅलेन्ज पूर्ण करण्यचा प्रयत्न करताना दिसतोय.
Image: Google
पंधरा मिनिटांच्या व्हिडिओत आपल्याला एक भली मोठी थाळी दिसते. ही थाळी उत्तर भारतीय पदार्थांनी काठोकाठ भरली आहे. या थाळीत टमाट्याचा शोरबा, पापडी चाट, कोबी मटारची भाजी, दाल तडका, कढी पकोडे, बटाटा पालक, मलाई कोफ्ता, सोया चाप मसाला, कढई पनीर, दाल मखनी, दम आलू, साग, पनीर टिक्का मसाला, व्हेज बिर्याणी, स्टीम राइस, वेगवेगळ्या प्रकारच्या पोळ्या, पापड, सलाड, रायता, मसाला कांदा,जलजीरा, गुलाबाचं सरबत आणि अजून अनेक पदार्थ या बाहुबली थाळीत दिसतात. ही थाळी नियोजित वेळेत संपवण्यासाठी रजनीश ज्ञानी आणि त्याचा मित्र अक्षरश: बकाबका खाताना दिसतात.
आपण बाहुबली थाळी चॅलेंज संपवल्याचं रजनीश सांगतात. हे चॅलेंज पूर्ण केल्याने आपल्याला 8 लाख रुपये बक्षिस मिळाल्याचंही रजनीश सांगतात. आपण हे पैसे सेवाभावी संस्थेला दान देणार असल्याचंही रजनीश ज्ञानी यांनी सांगितलं आहे.
हे वाचून आणि हा व्हिडिओ पाहून 'बाबा रे तुमच्या पोटाचं काय झालं तेही जरा इथे सांगा!' म्हणत व्हिडिओला प्रतिक्रिया मिळत आहे.