Join us  

गुगल म्हणतेय करा मस्त पाणीपुरी! कशी? पाहा पाणीपुरी गुगल डूडल, पावसाळ्यात पाणीपुरीची मजा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2023 12:10 PM

Google Doodle Panipuri Special game : पाणीपुरीचा एक छानसा गेम देऊन गुगले आपली कल्पकता दाखवून दिली आहे.

पाणीपुरी म्हणजे भारतीयांसाठी सगळ्यात आवडते स्ट्रीट फूड. भारताच्या विविध भागात विविध प्रकारची पाणीपुरी मिळते आणि खवय्यांकडून ती तितक्याच आवडीने खाल्ली जाते. घरी कितीही चांगली पाणीपुरी करायचा प्रयत्न केला तरी रस्त्यावर मिळणाऱ्या पाणीपुरीची सर कशालाच नाही. खाद्यपदार्थाविषयीची हीच आवड लक्षात घेऊन चक्क गुगलने आज पाणीपुरीचे डुडल बनवले आहे. आता अशाप्रकारे खास पाणीपुरीचे डुडल बनवण्यामागे नेमके काय कारण असावे असा प्रश्न आपल्याला पडला असेल तर हे कारण आपण समजून घ्यायला हवे. २०१५ मध्ये १२ जुलै रोजी मध्य प्रदेशच्या इंदौर येथील एका हॉटेलने ५१ प्रकारची पाणीपुरीचे फ्लेवर तयार करुन ती आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिली होती. त्यावेळी त्यांनी याचे जागतिक रेकॉर्डही केले होते. हेच निमित्त साधून आज गुगलने हे अनोखे डुडल तयार केले आहे (Google Doodle Panipuri Special game). 

गुगल नेहमीच काही ना काही निमित्ताने आकर्षक असे डुडल बनवून आपल्या चाहत्यांना खूश करायचा प्रयत्न करत असते. यावेळीही पाणीपुरीचा एक छानसा गेम देऊन गुगले आपली कल्पकता दाखवून दिली आहे. गुगलचा युजर म्हणजे पाणीपुरी विक्रेता आहे आणि त्याने आपल्या ग्राहकांना सांगितल्याप्रमाणे पाणीपुरी तयार करुन द्यायच्या आहेत. यामध्ये चिंचेची पाणीपुरी , हिरव्या चटणीची पाणीपुरी आणि दहीपुरी अशा तीन प्रकारच्या पाणीपुरी दिसत आहे. वेगवेगळ्या ग्राहकांची आवड लक्षात घेऊन पाणीपुरी सर्व्ह करावी लागेल. कोणती पाणीपुरी आणि किती पाणी पुरी निवडायाच्या हे तुम्हाला स्क्रिनवर दिसेल. त्याप्रमाणेच तुम्हाला पाणीपुरी निवडावी लागेल म्हणजे तुम्ही तुमचा स्कोअर वाढवू शकता. गेम खेळल्यानंतर आपला स्कोअरही त्याठिकाणी येणार आहे.

(Image : Google)

पाणीपुरीला पुचका, गोलगप्पा, गपचुप अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. दक्षिण भारतात अतिशय आवडीने खाल्ला जाणारा हा पदार्थ कसा तयार करतात तेही गुगलने यामध्ये सोप्या पद्धतीने सांगितले आहे. तळलेल्या पुऱ्या अतिशय चविष्ट चटणी आणि वेगवेगळ्या फ्लेवरच्या पाण्यासोबत दिली जाते. तुम्हीही भुकेलेल्या ग्राहकांना ही पाणीपुरी आता सर्व्ह करा असे सांगत या खेळाची सुरुवात होते. अतिशय इंटरेस्टींग असा गेम याठिकाणी देत गुगलने आपले वेगळेपण जपल्याचे दिसते. एखाद्या व्यक्तीचा गौरव म्हणून, खास दिवसाचे औचित्य साधत गुगल करत असलेले प्रयोग खरंच कौतुकास्पद असतात हे नक्की.  

टॅग्स :सोशल व्हायरलअन्नगुगल