थंडी आणि पावसाळ्याचे वातावरण पडले की मस्त फिरायला जाताना आपल्याला सगळ्यात आधी काय आठवते तर गरमागरम भजी. रस्त्याच्या बाजुला असलेल्या एखाद्या टपरीवर किंवा धाब्यावर आपण आवर्जून भजी खाण्यासाठी थांबतो. सोबत मिरची, एखादी चटणी असेल तर मग काय विचारायलाच नको. मग यामध्ये कांदा भजी, बटाटा भजी, मिरची भजी अशा वेगवेगळ्या भजींची फर्माईश केली जाते. घरी भजी करायची असतील तर अनेक जण घोसावळे, केळी, पालक अशी वेगवेगळ्या प्रकारची भजीही करतात. पण तुम्ही कधी ओरिओ बिस्कीटाची भजी खाल्ली आहेत? नाही ना...मग हा व्हिडिओ एकदा बघाच..गुजरातमध्ये एकाने ओरिओ बिस्कीटाची भजी केली आहेत आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
बेसन पीठात ओरिओची बिस्कीट टाकणारा एक व्यक्ती यामध्ये दिसत आहे. त्याने ही बिस्कीटे पीठात घोळवून थेट तेलात सोडली आणि भजींप्रमाणेच त्याला तळून काढले. यानंतर रितसर मिरचीसोबत ही भजी ग्राहकांना दिली. रमण या व्यक्तीच्या धुवाधार नावाने केलेल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडियो पोस्ट करण्यात आला आहे. ओरिओ के पकोडे फ्रॉम अहमदाबाद, गुजरात अशी कॅप्शन देत या व्हिडियोवर आश्चर्यकारक आणि रडणारे स्माईलीही टाकण्यात आले आहेत. युट्यूबच्या एका चॅनेलवर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडियो ट्विटरवर दोन लाखांहून अधिक जणांनी पाहीला आहे. तर अनेकांनी तो रिट्विट केला आहे. गुजरातमधील आपल्या ओळखीच्या लोकांना टॅग करत याठिकाणी एसेही काही केले जाते का असे नेटीझन्सनी विचारले आहे. अशाप्रकारची रेसिपी बनवल्याबद्दल अनेकांनी नाराजीच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
लोक काय करतील सांगता येत नाही. वेगवेगळ्या रेसिपी शोधून काढणारे बरेच जण असतात. ओरिओ केक, ओरिओ मिल्क शेक, ओरिओ आइसक्रीम, ओरिओ सँडविच आतापर्यंत ऐकले होते. पण ओरिओची भजीही होऊ शकतात हे मात्र माहित नव्हते. काय मग तुम्ही करुन पाहणार का ही ओरिओ बिस्कीट भजी ट्राय?