पी. व्ही. सिंधू ही नेहमीच तिच्या स्टनिंग लूकबाबत चर्चेत असते. तिचे आऊटफिट्स, हेअरस्टाईल आणि एकंदरीतच फॅशन सेन्स चर्चेचा विषय असतो. ऑलिम्पिक सुरू असताना पी. व्ही. सिंधूने केलेल्या नेलआर्टचे फोटो देखील जबरदस्त व्हायरल झाले होते. सध्या तिने नेसलेल्या साडीची जबरदस्त चर्चा सोशल मिडियावर सुरू आहे. तिची ही साडी प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांनी डिझाईन केली आहे.
एका खाजगी कार्यक्रमासाठी जाताना सिंधूने ही साडी नेसली होती. मोतिया कलरची ही साडी सिंधूवर अतिशय उठून दिसत आहे. थ्रेड वर्क प्रकारातली ही साडी असून साडीवर गुलाबी, जांभळ्या आणि हिरव्या रंगाने फुले विणलेली आहेत. साडीला आणखी उठावदार करण्यासाठी छोटे छोटे खडे लावून साडी डिझाईन केलेली आहे. या साडीवर सिंधूने स्लिव्हलेस ब्लाऊज घातले असून तिचा लूक अतिशय स्टनिंग दिसत आहे.
कशी असते थ्रेडवर्क साडी?
साडीवर जेव्हा सुती, रेशमी, लोकरी धाग्याने नक्षी तयार केली जातात, तेव्हा त्या साडीला थ्रेडवर्क साडी म्हणतात. बोली भाषेत सांगायचे झाल्यास सुई आणि दोऱ्याने साडीवर केले जाणारे नक्षीकाम. शंख- शिंपले, मणी, काचा किंवा वेगवेगळ्या रंगाचे खडे लावून या साडीला आणखी सुशोभित केले जाते. थ्रेड वर्क साडी हा विणकामाचाच एक भाग आहे. थ्रेडवर्क साडीमध्ये जवळपास ३०० प्रकारचे वेगवेगळे टाके असतात. जेवढी सुबक टाक्याची ठेवण असते, तेवढी जास्त साडीची किंमत. बहुतांश थ्रेडवर्क प्रकारात हे सगळे काम हाताने करण्यात येते.
बॅडमिंटन कोर्टवर दिसणारी रांगडी सिंधू साडी अतिशय आकर्षक पद्धतीने कॅरी करताना फोटोंमध्ये दिसून आली. याबद्दल फॅशन जगताकडून तिचे खूप कौतूक होत आहे. या गेटअपला आणखी बहारदार करण्याचे काम तिच्या मोकळ्या केसांनी केले आहे. तिने केस हलकेसे कर्ल करून मोकळे सोडले होते. साडीसोबतच सिंधूने घातलेले डायमंड नेकलेस आणि डायमंड इअररिंग्स हा देखील चर्चेचा विषय आहे. एकंदरीतच भारतीय वेशभुषेत सिंधूचे सौंदर्य अधिक खूलून आले असल्याचे तिचे चाहते म्हणतात. सिंधूने नेसलेली साडी १ लाख ९५ हजार रूपयांची आहे. आता बॉलीवुडमधील प्रसिद्ध सिनेतारकांचे ड्रेस डिझायनर मनिष मल्होत्रा यांनी ही साडी डिझाईन केली आहे म्हंटल्यावर साडीची किंमत लाखाच्या घरात असणार हे नक्कीच !