मूल होणं , मूल होवू देणं, मूल न होवू देण्याचा निर्णय घेणं या सर्व बाबी म्हणजे केवळ घटना नाही. त्याच्याशी त्या स्त्रीच्या, आई बाबा झालेल्या, होणाऱ्या, होवू न शकणाऱ्या स्त्री पुरुषांच्या भावना संवेदना जोडलेल्या असतात. पण असं असूनही या बाबींवर जेव्हा असंवेदनशील प्रतिक्रिया व्यक्त होतात, त्याही विशेषत: महिलांकडून तेव्हा मात्र ती खेदाची बाब असते. अशी घटना जगाच्या पाठीवर कुठेही आणि कोणाच्याही बाबतीत घडली असली तरी त्याबाबतच्या प्रतिक्रिया उमटतातच. हेच पाकिस्तानी अभिनेत्री नादिया अफगाणच्या (pakistani actress nadia afghan) बाबतीत घडलं.
Image: Google
एका मुलाखतीत तिनं मूल होवू न देणं ही आपली आणि आपल्या नवऱ्याची इच्छा असून आपल्याला हे जग सुरक्षित वाटत नाही' असं सांगितलं. तिच्या या विधानावरुन तिला ट्रोल करण्यात आलं. पुरुषांसोबतच महिलांनी देखील अस्ंवेदनशील प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्या प्रतिक्रिया वाचल्यानंतर महिला महिलांचं दु:ख समजून घेतात हा आपला समज चुकीचा ठरला असं नादिया अफगाणनं खेदानं म्हटलं त्यासोबतच (nadia afghan opens up about not having children) आपली मूल न होण्याच्या निर्णयाप्रत येण्याची वेदनादायी गोष्ट ही सांगितली.
नादिया सांगते की आपला दोन वेळा गर्भपात झाला. दोन वेळा आपली मुलं गर्भातच गेली. यानंतर प्रचंडं शारीरिक आणि मानसिक वेदनांना सामोरं जावं लागलं. आयव्हीएफद्वारे गर्भधारणा होण्यासाठी आपण तिनदा प्रयत्न केले. पण ते यशस्वी झाले नाही. या सर्व प्रवासात नादिया मनानं खचली. निराश झाली. तिला नैराश्यानं गाठलं. पॅनिक अटॅक येवू लागले. शरीरातील हार्मोन्सचं असंतुलन झाल्यानं वजन वाढलं. नादिया सोबत तिचा नवरा जावेद आलियास जोडे पे हे दुखं पाहात आणि भोगत होता. त्याने नादियाच्या आरोग्यास, भावनिक आणि मानसिक आरोग्यास प्राधान्यं देवून मूल होवू न देण्याचा एकत्रित निर्णय घेतला. यावर सार्वजनिकरित्या बोलण्याचं नादिया टाळत होती. कारण जे भोगलं त्यावर नुसत्या बोलण्यानंही तिला वेदना होत होत्या. नादिया म्हणते मी भोगलेल्या वेदना काय असतात हे कोणतीही स्त्री ती आई असो अथवा नसो समजू शकते. पण आपला हा समज आपल्या निर्णयावर बायकांनी असंवेदनशील रितीने व्यक्त होवून चुकीचा ठरवल्याचं नादिया खेदानं सांगते.
Image: Google
प्रेगन्सी टेस्टच्या स्ट्रीप वरच्या दोन लाल रेषांनी आपलं शारीरिक आणि भावनिक आयुष्य उध्वस्त झालं. यामुळे ज्या वेदना होत होत्या तितक्याच वेदना आपल्या निर्णयावर महिला एखाद्या टोळीप्रमाणे तुटून पडल्यानं झाल्या असं नादिया सांगते. नादिया अफगाणनं पाकिस्तानी महिला हक्कासाठी राजदूत म्हणून काम केलं आहे. ज्या महिला एकत्र आहेत, एकमेकींना ज्या प्रोत्साहन देतात, एकमेकींच्या स्वातंत्र्याचा ज्या आदर करतात त्यांना आई होण्याच्या वेदना माहीत असतात. तसेच आपल्याला आई होता आलं नाही ते चारचौघात सांगण्याचं दुखं काय आणि किती असतं हेही माहीत असतं. पण हा समज महिलांनी चुकीचा ठरवल्यानं आपण खूप दु:खी झाल्याचं नादिया म्हणते. नादियाची महिलांनीच टोळीप्रमाणे आक्रमण केल्याची ही वेदना खरंतर कोणत्यही संवेदनशील स्त्रीला अस्वस्थ करणारी अशीच आहे.