मॅट्रीक परीक्षेत किंवा कोणत्याही परीक्षेत एखाद्या विद्यार्थ्याने जर ११०० पैकी ११०० गुण मिळविले आहेत, असे आपल्याला समजले तर आपल्या मनात आपसूकच एक विचार डोकावून जातो. तो म्हणजे पैकीच्या पैकी गुण मिळवून अशी चमकदार कामगिरी करणारा विद्यार्थी निश्चितच यूरोप किंवा अमेरिकेतला असेल. पण एक मोठे आश्चर्य घडले आहे आणि ते देखील आपला शेजारी असणाऱ्या पाकिस्तानात.पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा याठिकाणी राहणाऱ्या कंदिल नामक विद्यार्थिनीने हा विक्रम घडवला आहे.
मर्दान बोर्ड अंतर्गत झालेल्या मॅट्रीक परीक्षेत कंदिलने ही कामगिरी केली असून आजपर्यंत कोणीही या परीक्षेत ११०० पैकी ११०० गुण घेऊन उत्तीर्ण झालेले नाही. कंदिलबाबत असे बोलले जाते की ती अनाथ होती. सोहेल अहमद यांनी तिला दत्तक घेतले. कंदिलने मिळविलेले हे गुण मर्दान बोर्डाची शान वाढविणारे ठरले आहेत. तिच्या गुणवत्तेचा गौरव म्हणून मर्दान बोर्डाने तिचे सर्व परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या यशाबाबत बोलताना कंदिल म्हणाली की आज मॅट्रीक परीक्षेत मला जे यश मिळाले आहे, त्यासाठी शिक्षकांनी माझ्यावर घेतलेली प्रचंड मेहनत आणि माझी आई देवाकडे कायम करत असलेली प्रार्थना या दोन गोष्टी जबाबदार आहेत.
या परीक्षेत फरहान नसीम दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. दुसरा क्रमांक पटकाविणाऱ्या फरहान नसीमला १०९८ गुण मिळाले आहेत. आजपर्यंत कोणीही केलेली नाही, अशी कामगिरी एका मुलीने करून दाखविल्यामुळे कंदिलचे सर्वत्र कौतूक होत आहे. सोशल मिडियावरदेखील कंदिल प्रचंड गाजत असून तिचा शोध घेण्यासाठी अनेक जण उत्सूक आहेत.