लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाची घटना असते. कोणी आपला जोडीदार स्वत: निवडतं तर कोणी घरच्यांनी ठरवलेल्या जोडीदारासोबत लग्न करते. लग्नाचा दिवस खास व्हावा यासाठी सध्या बरेच नियोजन केले जाते. लग्नाचे कपडे, दागिने, स्थळ, पाहुणे, मेन्यू या सगळ्याचे प्लॅनिंग प्रत्येक जण करतो. इतकेच नाही तर आपल्या होणाऱ्या जोडीदाराचा हा दिवस खास व्हावा म्हणून नवरा-बायको एकमेकांना काहीतरी खास गिफ्टही देतात. आता हे गिफ्ट म्हणजे दागिने, कपडे किंवा आणखी काही स्पेशल असते. पण एका नवरदेवाने आपल्या होणाऱ्या पत्नीला काय दिले असेल याची आपण कल्पनाच करु शकत नाही. तर या जोडीदाराने पत्नीला भेट म्हणून चक्क गाढव दिले (Pakistani Groom Gifts His Wife Donkey).
आता असे करण्यामागे नेमके काय कारण असावे असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडू शकतो. तर पाकिस्तानी युट्यूबर अजलान शाह याने आपली पत्नी वारिशा हिला हे अनोखे गिफ्ट दिले आहे. अजलान प्रसिद्ध युट्यूबर असून त्यांचे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत. त्यांनी स्वत: आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या गाढवाच्या पिल्लाचे फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या इ्स्टाग्राम पोस्टला अनेकांनी लाईक केले असून बऱ्याच जणांनी त्यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. आता असे गिफ्ट का दिले असे विचारले असता, “आपल्या पत्नीला गाढव आवडते हे आपल्याला माहित होते म्हणून आपण हे वेगळे गिफ्ट दिले. तसेच गाढव हा अतिशय प्रेमळ आणि मेहनती प्राणी असल्याने आपण गाढव गिफ्ट दिले.” असे अजलान म्हणाले.
या लहान गाढवाच्या पिल्लाला त्याच्या आईपासून आपण वेगळे केलेले नाही असेही अजलान यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहीले आहे. तर या गाढवाच्या आईलाही आपण सोबत घेऊन आल्याचे त्यांनी म्हटले आहे. या दोघांना आपण ३० हजार रुपयांना खरेदी केले आहे. याबाबत बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितले. माझ्याप्रमाणे वारिशा प्राणीप्रेमी आहे. त्यामुळे मी तिला हे सरप्राईज गिफ्ट दिले आहे. या आई आणि पिल्लू गाढवाला आता मजूरीचे काम करावे लागणार नाही, तर दोघेही माझ्या फार्मवर मजेत राहतील. आता असे आगळेवेगळे गिफ्ट दिल्याबद्दल लोक आमच्याबाबत काय विचार करतात याचा मला फरक पडत नाही असेही अजलान पुढे म्हणतात.