एकीकडे मुलीच्या जन्मानंतर दणक्यात आनंदोत्सव साजरा (celebration) करणारेही कुटूंब आहेत तर दुसरीकडे मात्र अजूनही मुलगीच झाली म्हणून तिला पाण्यात पाहणारेही खूप आहेत. मुलाची वाट पाहत एका मागे एक मुलींना जन्म देणाऱ्या पालकांचीही काही कमी नाही. पण या सगळ्यांमध्ये एक आशेचा किरण आता दिसू लागला असून मुलगी झाली या गोष्टीचा आनंदही आता साजरा केला जात आहे. एकवेळ मुलगा झाला या आनंदात करणार नाहीत, असा जंगी थाट मुलीच्या जन्मानंतर आता काही कुटूंबात करण्यात येतोय.
मुलीचा जन्म झाला म्हणून कुणी थेट हेलिकॉप्टरमधून तिला घरी आणलं तर कुणी ढोल- ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढून वाजत गाजत लेकीचा थाट केला. आता हा एक पिताही असाच. या पित्याने (panipuri seller) त्याच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला तब्बल १ लाख १ हजार पाणीपुरी खवय्यांना मोफत खाऊ घातल्या. हा पिता आहे मध्यप्रदेशातील भोपाळ या शहरातला. भोपाळमधील कोलार या भागात आंचल गुप्ता यांचे चाट सेंटर असून त्यांनी त्या ठिकाणीच मोठा मंडप उभारून मुलीच्या पहिल्या वाढदिवसाचा आनंदोत्सव साजरा केला.
आंचल गुप्ता यांनी मोठ्या उत्साहात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यासाठी त्यांनी ५० मीटर लांबीचा भव्य मंडप उभारला आणि पाणीपुरी वाटपाचे जवळपास २१ स्टॉल उभे केले. कार्यक्रमाच्या ठिकाणी सगळीकडे 'बेटी बचाओ, बेटी पढाओ', ‘बेटी वरदान है' असे फलक लावण्यात आले होते. जवळपास दिवसभर हा सोहळा सुरू होता. ज्याची कुणाची पाणीपुरी खाण्याची इच्छा होईल, त्याने यावे आणि अगदी मन भरेपर्यंत हवी तेवढी पाणीपुरी खावी, अशा पद्धतीचा हा सोहळा होता. एक वर्षापुर्वी मुलीचा जन्म झाला तेव्हाही त्यांनी ५० हजार पाणीपुरींचे मोफत वाटप केले होते.