पती-पत्नीमधील प्रेमाच्या गोष्टी विविध मार्गाने अनेकदा आपल्यासमोर येतात. कधी जोडीदाराने समोरच्या व्यक्तीसाठी केलेला त्याग तर कधी जोडीदाराच्या अनुपस्थितीत एखाद्याने केलेली एखादी कृती अनेकांचे लक्ष वेधून घेणारी ठरते. नुकतीच अशीच एक गोष्ट सगळ्यांसमोर आली असून पतीने आपल्या पत्नीच्या अनुपस्थितीत ती सोबत असल्याचा फील यावा यासाठी काय केले हे पाहून आपल्यालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही (Viral Photo). सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात घडणारी एखादी घटना अगदी काही वेळात आपल्यापर्यंत सहज पोहोचते. पत्नी सोबत राहावी म्हणून फिलिपाइन्समधील एका पतीने काय केले पाहूया (Philippines Man Goes on Vacation With Wife's Face Pillow).
हा पती सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आपल्या पत्नीसोबत कुठेतरी ट्रीपला जाणार होता. मात्र काही कारणामुळे ऐनवेळी या पत्नीला ट्रीपला जाणे रद्द करावे लागले. ऐनवेळी तिला अशाप्रकारे ट्रीप रद्द करावी लागल्याने पती काहीसा नाराज झाला. असे असले तरी पतीने एकट्याने ट्रीपला जायचे ठरवले. मात्र एकट्याने ट्रीपला जातानाही पत्नी आपल्या सोबत असावी यासाठी त्याने एक अनोखी शक्कल लढवली. कायम एकमेकांसोबत राहत असल्याने अनेकदा पती-पत्नीला एकमेकांशिवाय करमत नाही. त्यामुळे पतीने लढवलेल्या या आयडीयामुळे पतीला पत्नीची कमतरता भासू नये यासाठी भन्नाट होती.
रेमंड फोर्टुनाडो या व्यक्तीने बऱ्याच दिवसांपासून सुट्ट्यांमध्ये फिलिपिन्समध्ये पालावान येथे जाण्याचे ठरवले होते. त्याची पत्नी जोआन ही फ्रीलान्स मॉडेल असल्याने तिला ऐनवेळी एक असाइनमेंट आली. ही असाइनमेंट करणे आवश्यक असल्याने त्यांना आपला सुट्टीचा प्लॅन रद्द करावा लागणार होता. पण पतीने एकट्याने ट्रीपला जायचे ठरल्यावर पतीने पत्नी सोबत राहावी यासाठी पत्नीचा चेहरा असलेली एक उशी आपल्या सोबत घेतली. या उशीवर पत्नीच्या मीम फोटो त्याने छापून घेतला. संपूर्ण ट्रीपमध्ये ही उशी तो आपल्या सोबत घेऊन फिरला. अनेक ठिकाणी तर त्याने या उशीला शेजारी घेऊन फोटोही काढले. त्याने काढलेले हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. हॉटेलमध्ये नाश्ता करतानाही ही उशी त्याने सोबत घेतली. इतकेच नाही तर विमानतळावर कोविडचे प्रोटोकॉल म्हणून उशीचे तापमानही तपासून घेतले.