प्रेमासाठी वाटेल ते करणारे लोक आपण चित्रपटात किंवा फारतर मालिकेत पाहतो. काहीवेळी प्रत्यक्षातही अशाप्रकारच्या घटना आपल्या कानावर पडतात. पण प्रेमासाठी काहीही करणारे आपण पाहिलेलेच असतात असं नाही. मात्र प्रेमात पार बुडालेल्या व्यक्ती प्रेमासाठी काही वेळा जीवाची बाजी लावू शकतात याचा प्रत्यय नुकताच आला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओच्या माध्यमातून ही गोष्ट पुन्हा एकदा समोर आली आहे. मूळ हरियाणाची असलेली एक महिला आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी जयपूरला गेली. इतकेच नाही तर या महिलेने आर्मी अधिकाऱ्यांच्या समोर धिंगाणा घातला. वीजेच्या खांबावर चढून या महिलेने खूप धिंगाणा केला (Photo of Women Climbing Electric Poll for Meeting Her Boyfriend Goes Viral on Internet).
पोलिसांना ही घटना समजल्यावर ते लगेचच घटनास्थळी दाखल झाले. या मुलीला वीजेच्या खांबावरुन खाली उतरण्यास सांगण्यात आले. मात्र तिने जवळपास २० मिनीटे पोलिसांशी हुज्जत घातली. अखेर पोलीसांना तिला खांबावरुन खाली उतरवण्यात यश आले. एका जवानासोबत आपण मागील बराच काळ लिव्ह इन रीलेशनशिपमध्ये राहत असल्याचे महिलेने यावेळी सांगितले. हा जवान आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप महिलेने केला. पोलीसांनी महिलेच्या विरोधात शांतीभंगाचा गुन्हा दाखल केला असून तिनेही जवानाच्या विरोधात तक्रार नोंदवली.
महिलेला संबंधित जवानाला भेटण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र तरीही महिलेने बाहेर येऊन धिंगाणा घातला असे याठिकाणी उपस्थित असलेल्या ठाणे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. या जवानाचे नाव सुरेंद्र असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या महिलेचे वीजेच्या खांबावर चढल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावर बऱ्याच चर्चा सुरू आहेत.