वय तर केवळ आकडा आहे, आयुष्याचा प्रत्येक क्षण आपण अतिशय आनंदाने जगायला हवा. कितीही वय झाले तरी आपल्यातली उर्मी आणि उत्साह कायम असेल तर आपण आयुष्य आनंदात जगू शकतो. साधारणपणे वयाची पन्नाशी किंवा साठी ओलांडली की आता आपले कसे होणार, आपले हात-पाय हलले नाहीत तर कोण आपली काळजी घेणार या विचारानेच वयस्कर व्यक्ती मनाने खचून जातात. पण शरीराने थकल्यावरही तुम्ही मनाने कायम तरुण असाल तर वयाची शंभरी पार केली तरी तुम्ही तुमच्या मनात असलेली कोणतीही गोष्ट, इच्छा अगदी सहज पूर्ण करु शकता. मनाचा खंबीरपणा हा शारीरिक क्षमतांपेक्षाही जास्त महत्त्वाचा असल्याने प्रत्येकाकडे तो असायलाच हवा. चांगली जीवनशैली आणि सकारात्मक विचार तुम्हाला जगण्याची आणि इतरही अनेक गोष्टींची प्रेरणा देत राहतात (Police Arrest woman at her 100th Birthday Party Viral Story Australia).
याचेच एक उदााहरण नुकतेच पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियात १०० वर्षांच्या एका आजींनी आपल्या बर्थडे पार्टीमध्ये अशी धमाल केली की ते पाहून आलेले पाहुणे अवाक झाले. १०० वा वाढदिवस म्हणजे त्याची पार्टी तर खास असणारच. या १०० वा वाढदिवशी या आजीने जी विश लिस्ट बनवली ती पाहून आलेले पाहुणे आश्चर्यचकीत झाले. बर्थडे पार्टी रंगात आलेली असताना १०० व्या वाढदिवशी अचानक जेव्हा पोलीस या महिलेला अटक करण्यास आले तेव्हा उपस्थितांना काहीसा धक्का बसला. विशेष म्हणजे ही १०० वर्षांची आजी मात्र कोणताही विरोध न करता अतिशय आनंदाने जेलमध्ये जाण्यास तयार झाली. आता यामागचे कारण ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
आपल्या १०० व्या वाढदिवसाचा केक कापत असताना पार्टीमध्ये अचानक पोलीस आले आणि त्यांनी या महिलेला ताब्यात घेतले. काही वेळ वातावरण एकदम गंभीर झाले, हे लक्षात घेऊन महिलेने स्वत:च आपण या पोलीसांना आपल्याला अटक करण्यासाठी बोलावले असल्याचे सांगितले. आपल्या राहीलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी या महिलेने अशाप्रकारचा घाट घातल्याने पोलीस आले होते आणि तिला अटक करुन घेऊन जात होते हे पाहून तर उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला. मृत्यू येण्याआधी एकदा तरी जेलमध्ये जायचे असे तिचे स्वप्न होते आणि ते पूर्ण करण्यासाठी महिलेने हा प्लॅन केला होता. व्हिक्टोरीया पोलिसांनी आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवर या घटनेबाबत पोस्ट केली. बंद गजाआड राहण्याचा अनुभव घेणे ही या महिलेच्या विश लिस्टमधील एक विश होती.