राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. त्यांचा साधेपणा (simplicity), आज शपथविधी सोहळ्यासाठी (President Oath 2022) त्यांनी परिधान केलेली साडी (Santhali saree), त्यातली सादगी हे सारे नितांत सुंदर होते. संथाली साडी त्यांनी सोहळ्यासाठी निवडली आणि आपल्या परंपरा, आणि हातमाग यांचाही सन्मान केला.
संथाली साडीचे वैशिष्ट्य
द्रौपदी मुर्मू यांनी भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. भारताचं सर्वोच्च पद सांभाळणाऱ्या त्या पहिल्याच आदिवासी महिला. भारताच्या प्रथम नागरिक पदाची शपथ घेताना आपल्या मातीशी असलेली नाळ जपत त्यांनी आपला संपन्न वारसाही जपला. या सोहळ्यासाठी त्यांनी नेसली खास संथाली साडी.
ही साडी अतिशय पारंपरिक धाटणीची आहे.
पांढऱ्या शुभ्र रंगाची साडी. साडीचे काठ वरच्या बाजुने लाल रंगाचे आणि खालच्या बाजूने हिरव्या रंगाचे. खालच्या बाजूच्या काठांवर एकसारखे टेम्पल डिझाइन होते. ही साडी त्यांच्या वहिनीने खास या कार्यक्रमासाठी आणली होती असं माध्यमात प्रसिद्ध झालेल्या बातम्या सांगतात.
या साडीचं वैशिष्ट्य म्हणजे या साड्या अजूनही बऱ्याच प्रमाणात हातमागावरच तयार केल्या जातात. त्यामुळे या साड्या बऱ्यापैकी महाग असतात. साधारण एक हजारापासून ते 10 हजारांपर्यंत किंवा अधिकही किंमत असते.
- संथाल समाजात लग्नकार्यासारख्या शुभ प्रसंगांमध्ये या प्रकारच्या साड्या नेसल्या जातात. फक्त लग्नकार्यात नेसल्या जाणाऱ्या संथाली साड्या लाल किंवा पिवळ्या रंगाच्या असतात.
- या साड्यांविषयी असंही सांगितलं जातं की पूर्वी या साड्यांवर धनुष्यबाणाचे डिझाईन असायचे. महिलांनाही स्वातंत्र्य हवे आहे, असा त्या डिझाईनचा अर्थ घेतला जायचा. आता मात्र या साड्यांवर रेषा, त्रिकोण, फुलं, पानं, चौकडा अशा नक्षी असतात.
- झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम, ओडिसा या राज्यात ही साडी हातमागावर तयार केली जाते.