पी. व्ही. सिंधू म्हणजे भारताची शान.. ऑलिम्पिकमध्ये दोन वेळा पदक जिंकून पी. व्ही. सिंधूने सगळ्याच भारतीयांना पुन्हा एकदा अभिमानाने मिरवण्याची संधी दिली. खेळाडू म्हणून आपण तिचे मैदानावरचे रांगडे रूप नेहमीच पाहतो. पण नृत्याच्या माध्यमातून तिच्यातले सुप्त कलागुण आणि एरवी खेळाडूच्या ड्रेसमध्ये दडून राहिलेले तिचे सौंदर्य पाहण्याचा प्रसंगी कधीतरीच येतो. अशाच एका प्रसंगाचा व्हिडियो सध्या सोशल मिडियावर कमालीचा व्हायरल झाला आहे. यामध्ये सिंधू चक्क कांजीवरम लेहेंगा घालून सुंदर नृत्य करताना दिसते आहे.
पी. व्ही. सिंधूला नुकताच पद्मविभूषण सन्मान देऊन गौरविण्यात आले. या सन्मान सोहळ्याच्या आधी काळ आधी सिंधूने तिचा हा डान्स व्हिडियो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. love nwantiti या इंग्रजी गाण्यावर पी. व्ही. सिंधूने नृत्य केले असून ते एखाद्या अभिनेत्रीलाही लाजवेल, एवढे लालित्यपुर्ण झाले आहे. अगदी काही सेकंदाचा हा व्हिडियो असला तरी यातून सिंधूचे अप्रतिम नृत्य कौशल्य लगेचच दिसून येते. गाण्यावर ठेका धरत धरत तिचे हळूवारपणे हात आणि कंबर हलवणे अतिशय सुरेख वाटते. #love #music #dancelove असा टॅग तिने या व्हिडियोला दिला असून यातूनच ती संगीत आणि नृत्याची चाहती आहे, हे दिसून येते. एका दिवसात या व्हिडियोला ४ लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत, हे विशेष.
या व्हिडियोमध्ये सिंधूने जेवढा छान डान्स केला आहे, तेवढाच छान तिचा लेहेंगा आहे. या व्हिडियोमध्ये ती अतिशय आकर्षक दिसत असून तिची हेअरस्टाईल आणि तिचा मेकअप यामुळे तिचा लूक कमालीचा बदलला आहे. सिंधूने या व्हिडियोमध्ये घातलेला लेहेंगा कांजीवरम सिल्कचा असून या लेहेंग्याचे काठ अतिशय मोठे आणि भरजरी आहेत. पिस्ता रंगाचा हा घागरा असून त्याचे काठ लालसर चॉकलेटी रंगात मोडणारे आहेत. या लेहेंग्यावर चंदेरी- सोनेरी रंगाने काम केले असून तिने त्याावर नेटची ओढणी घेतली आहे.
सिंधूची दागिन्यांची निवडही अतिशय क्लासी ठरली आहे. हेवी वर्क असणाऱ्या घागऱ्यावर तिने डायमंड ज्वेलरी घातली आहे. मोठे हेवी कानातले, तेवढेच हेवी वर्क असणारे गळ्यातले, कंबरपट्टा आणि एका हातात एक छोटेसे कडे असे एवढेच दागिने घालूनही ती अतिशय आकर्षक दिसत आहे. तिने केलेली हेअरस्टाईलही तिच्या गेटअपला सूट होणारी आहे. यामध्ये तिने एका बाजूने शेवटपर्यंत वन साईडेड वेणी घातली आहे आणि त्यानंतर सगळे केस एका बाजूला वळवून पोनी बांधला आहे.
डान्स करताना ती स्वत:मध्ये अतिशय रममाण झाली असून नृत्य करतानाचे तिचे मोहक हास्य तिच्या सौंदर्यात आणखी भर टाकणारे ठरते आहे. एखादी गोष्ट करण्यात आपण खूप एक्सपर्ट नसलो तरी चालते. फक्त आपण ती गोष्ट किती आनंदाने करतो, हे महत्त्वाचे आहे. कारण कोणतीही गोष्ट करताना जर प्रत्येक क्षणाचा आनंद घेता आला, तर ती गोष्टी पी. व्ही. सिंधूच्या नृत्याइतकीच बहारदार होईल यात शंका नाही.