लग्न ही कुठल्याही मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट. लग्नामुळे आयुष्य बदलतं तर लग्न होतानाचा प्रत्येक क्षण मनावर कोरला जातो, जो आयुष्यभर जशाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहतो. लग्नाच्या दिवशी आजूबाजूला काय काय घडत असतं. किती, विधी आणि परंपरा पार पाडाव्या लागतात. पाहुण्यांची गर्दी, मैत्रिणींचा घोळका, जवळ येणारा मुहूर्त, मेकअपची घाई, मनात होणारी चलबिचल. आनंदानं भरलेलं मन आणि डोळ्यात काहीतरी सुटत चालल्याचं दुख. लग्न किती हॅपनिंग गोष्ट आहे. त्या दिवशी , त्या क्षणाला इतर काही महत्त्वाचं नसूच शकतं. किमान नवरदेव आणि नवरीसाठी तरी. पण गुजरात राज्यातील राजकोटमधील शिवांगी बागथरिया ही मात्र याला अपवाद आहे बरं का! लग्नाच्या ऐन मुहुर्तावरच तिची पदवीची परीक्षाही आली. लग्न की पेपर या द्वंदात तिने आधी पेपर निवडला. लग्नाच्या स्टेजवर उभं राहाण्याआधी शिवांगीनं परीक्षेचा हॉल गाठला आणि आधी परीक्षा दिली.
Image: Google
शिवांगी बागथरिया ही नवरीच्या वेषात सौराष्ट्र विद्यापिठाच्या सोशल वर्कच्या पाचव्या सेमिस्टरच्या परीक्षेसाठी आली आणि सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरली. तिला बघून अनेकींनी म्हटलं देखील, ‘अगं आज लग्न आहे तर परीक्षा पुढे दिली असती.’ पण शिवांगीच्या मते लग्न थांबू शकत होतं ( जे तिनं थांबवलंही) पण परीक्षेची वेळ थांबणार नव्हती. एवढ्या दिवस मन लावून केलेला अभ्यास वाया जायला नको म्हणून कोण काय म्हणेल , कोण कसं बघेल याचा कसलाही विचार न करता लग्नाचा वेष आणि दागिने घालून शिवांगी आपल्या होणार्या नवर्यासोबत परीक्षा केंद्रावर आली. नवरदेव आणि इतर कुटुंबिय परीक्षा केंद्राच्या बाहेर उभे राहिले आणि शिवांगीनं मन लावून पेपर सोडवला.
परीक्षेच्या दिवशीच लग्न कसं काय ठेवलं? असा प्रश्न तिला अनेकांनी विचारला . त्यावर शिवांगी म्हणाली, ‘लग्नं आधी ठरलं आणि विद्यापिठाने परीक्षेचं वेळापत्रक नंतर जाहीर केलं. लग्नाच्या दिवशीच नाहीतर लग्नाच्या मुहुर्तावरच पेपर होता. काय करावं हे आधी सूचत नव्हतं. पण मला पेपर चुकवायचा नव्हता. मी माझ्या घरी, सासरी सगळ्यांशी बोलले. माझा अभ्यास वाया जाईल ही कळकळ तर सांगितलीच पण परीक्षा द्यायचीच आहे ही इच्छाही ठामपणे मांडली. दोन्हीकडच्या मंडळींनी जराही न काचकूच करता, लग्नाचा मुहुर्त चुकेल याचा खेद न वाटून घेता मला परवानगी दिली. आणि मी निश्चिंत मनानं पेपर सोडवू शकले!’
Image: Google
शिवांगीचा पेपर लिहितानाचा व्हिडीओ सोशल मीडियावरुन व्हायरल झाला.या तिच्या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळालेत. लग्न असतानाही आधी प्राधान्य परीक्षेला देणार्या शिवांगीवर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला. तर लग्नाचा मेकअप करुन परीक्षा देण्याचा देखावा कशाला करायचा म्हणून तिला ट्रोलही करण्यात आलं. पण अनेकांनी या ट्रोल करणार्यांच्या प्रतिक्रियांवर टीका करत शिवांगीच्या जागी आपण असतो तर काय केलं असतं असा विचार करुन पाहा. जे शिवांगीला जमलं ते आपल्याला जमेल का? हे स्वत:ला विचारुन पाहा आणि मग प्रतिक्रिया द्या असंही ट्रोलर्सना सुनावलं.
Image: Google
पण आपल्या लग्नाच्या मुहुर्ताचाही विचार न करणार्या शिवांगीला ट्रोलर्सच्या प्रतिक्रियांचं दुख नाही की लोकांनी केलेल्या कौतुकाचा आनंद नाही. शिवांगीनं वेळेत पेपर सोडवून आनंदी मनानं थेट लग्न मंडप गाठला. आपलं लग्न मुहूर्तावर होत नाहीये याचा शिवांगीला खेद वाटला नाही. उलट पेपर सोडवण्याची आपली संधी हातची गेली नाही याचा आनंद लग्नमंडपात पोहोचलेल्या शिवांगीच्या चेहर्यावरुन ओसंडून वाहात होता.