दिवाळी (Diwali 2024) हा सण रंगीबेरंगी रांगोळ्यांशिवाय अपूर्णच आहे. पूर्वी घराबाहेरील अंगणात रोज रांगोळी काढली जायची. रांगोळीला धार्मिक आणि सांस्कृतिक असे विशेष महत्त्व आहे. दिवाळीत आपण घरा-दाराबाहेर रांगोळी काढून सजावट करतो. रांगोळी काढणे ही एक प्रकारची कलाच आहे. रांगोळीचे वेगवेगळ्या प्रकारचे रंग, सुंदर फुलांच्या पाकळ्या, तांदूळ, गव्हाचे पीठ, हळद यांसारखे साहित्य वापरून रांगोळी काढली जाते. चौरस, वर्तुळाकार, आयताकृती इत्यादी अनेक आकारात रांगोळी काढली जाते. बदलत्या काळानुसार रांगोळीचे रुपही बदलत गेले. ठिपक्यांची, मुक्तहस्त, संस्कारभारती असे रांगोळीचे वेगवेगळे नवीन प्रकार येऊ लागले(Rangoli Tips).
रांगोळी दिसायला जितकी सुंदर, नाजूक आणि नक्षीदार असते तितकीच ती काढण्यासाठी हाती कसब लागते. सुंदर, आखीव, रेखीव रांगोळी काढून त्यात शोभतील असे रंग भरायच म्हटलं तर तासंतास घालवावे लागतात. अशी तासंतास मान - पाठ एकत्र करुन फार मेहेनतीने काढलेली रांगोळी पुसली गेली तर फारच वाईट वाटते. काहीवेळा चुकून आपलाच हात लागून रांगोळी (Rangoli Hack) पुसली जाते. तर कधी वाऱ्याने रांगोळी पसरते. अशावेळी आपण घेतलेली मेहेनत ही वाया जाते आणि फार दुःख होते. असे होऊ नये म्हणून आपण दोन साध्यासोप्या ट्रिक्सचा वापर करणार आहोत. या सोप्या ट्रिक्स वापरुन आपण काढलेली रांगोळी लगेच पुसली जाऊ शकत नाही(How to make rangoli last longer).
रांगोळी पुसली जाऊ नये म्हणून...
१. मोहरीचे तेल :- रांगोळी पुसली जाऊ नये म्हणून आपण मोहरीच्या तेलाचा वापर करु शकतो. काहीवेळा घरातील लहान मुलं रांगोळी नकळतपणे पुसतात किंवा कधी आत - बाहेर करताना आपलाच रांगोळीवर पाय पडतो. अशावेळी रांगोळी पटकन पसरली जाऊन विस्कटते. असे होऊ नये यासाठी मोहरीच्या तेलाची एक सोपी ट्रिक नक्की ट्राय करुन पाहा. यासाठी रांगोळी काढण्याआधी, आपण ज्या भागात रांगोळी काढणार आहोत तेवढ्या भागात मोहरीचे तेल ओतून ते हाताने किंवा कापसाच्या मदतीने सगळ्या भागात पसरवून घ्यावे, त्यानंतर त्यावर रांगोळी काढावी. हा उपाय केल्याने रांगोळी या तेलावर चिकटून बसते आणि शक्यतो लगेच पसरत नाही. तेलावर रांगोळी चिकटल्याने पटकन रांगोळी पुसली जात नाही.
Diwali : पाडवा आणि भाऊबिजेला करा मसाला पुरी, श्रीखंड आणि बटाटा भाजीसोबत खा खास पुरी...
दिवाळीत नवीन झाडूची खरेदी केली, झाडूचा भुसा पडू नये म्हणून ४ उपाय, जराही भुसा पडणार नाही...
२. लाल गेरु :- पूर्वीच्या काळी रांगोळी काढण्यापूर्वी रांगोळीसाठी लागणारी जागा लाल गेरूच्या दगडाने सारवली जात असे. लाल गेरुने जमीन सारवून घेतली असता. गुळगुळीत जमिनीला सुद्धा थोडे रफ खडबडीत असे टेक्श्चर येते. या खडबडीतपणामुळे रांगोळीचे कण यात जाऊन बसतात.यामुळे रांगोळी व्यवस्थित एकाच ठिकाणी सेट होते. त्यामुळे ती वाऱ्याच्या झोताने उडून पसरत नाही आणि लगेच पुसलीही जात नाही. तसेच लाल गेरूने सारवून त्यावर रांगोळी काढल्याने ती दिसायलाही अधिक सुंदर, आकर्षक आणि उठून दिसते.
अशाप्रकारे आपण या दोन सोप्या ट्रिक्स वापरल्या तर रांगोळी पुसली न जाता बरेच दिवस अगदी आहे तशीच राहील.