सध्याचं जग डिजिटल झालंय. खिशात पैसे न ठेवताही झटक्यात लाखो करोडो पैशांची देवाण घेवाण सहज होते. डिजिटल वर्क, डिजिटल मीटींग यामुळे या जगाची चांगलीच ओळख झालीये. पण लग्न, साखरपुडा, वाढदिवस , वास्तुशांती या सोहळ्यांना प्रत्यक्ष नातेवाईकांची उपस्थिती लागतेच. कोणी आलंच नाही तर सोहळ्यातून आनंद कसा मिळणार? पण हा प्रश्नही आता सुटण्याच्या मार्गावर आहे. तामिळनाडूतील दिनेश एसपी आणि नागानंदिनी रामास्वामी या जोडप्याच्या स्वागतसमारंभाद्वारे हा प्रश्न सुटणार आहे. सध्या दिनेश एसपी आणि नागानंदिनी यांच्या लग्नापेक्षाही त्यांच्या होणाऱ्या रिसेप्शनची चर्चा देशभरात होतेय. कारण त्यांचं रिसेप्शन म्हणजे मेटाव्हर्सच्या थ्रीडी डिजिटल व्यासपिठावर होणारा हा भारतातील पहिला सोहळा आहे. तामिळनाडुतील कृष्णगिरी येथील शिवलिंगपुरम या गावात दिनेश आणि नागानंदिनी यांचं लग्न 6 फेब्रुवारीला होणार असून त्यांच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा रंगणार आहे तो थेट हॅरी पाॅटर सिनेमातील त्या प्रसिध्द हाॅगवार्ट या किल्ल्यावर.
Image: Google
मेटाव्हर्सवरील हाॅगवार्ट या किल्ल्यावर स्वागत समारंभासाठी पाहुण्यांना कोणता पेहराव करायचा, दागिने कोणते आणि किती घालायचे, तिथे जायचं तर व्हिसा, विमानाचं तिकिट याची कसलीही चिंता करण्याची, त्यासाठी धावपळ करण्याची गरज नाही. आपण् निवडलेल्या अवताराच्या रुपात त्यांना या सोहळ्यासाठी यावं लागणार आहे. या अवतारासाठी खूप काही जमवाजमव करण्याची गरज नसते. तर ज्यांनी हा सोहळा आयोजित केलेला असतो, ते या सोहळ्याची एक थीम ठरवतात. या थीममधील आपण आपल्या आवडत्या पात्राचं नाव सांगितलं की त्या विशिष्ट अवतारात त्या सोहळ्यास हजेरी लावण्याची संधी मिळते. फक्त आपल्या लॅपटाॅपसमोर यायचं, दिलेली लिंक क्लिक करायची आणि सोहळ्याचा आनंद घ्यायचा. दिनेश आणि नागानंदिनीच्या रिसेप्शनला हजेरी लावणारे पाहुणे त्यांना भेटवस्तू देखील ऑनलाइन व्हाउचर , गुगल पे या डिजिटल माध्यमांच्या द्वारे देणार आहेत.
Image: Google
मद्रास येथील आयआयटी प्रोजेक्टमधे काम करतात. क्रिप्टोकरन्सी सारख्या ब्लाॅगचेनमधे काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. तर त्यांची होणारी जोडीदार नागानंदिनी ही साॅफ्टवेअर इंजिनिअर आहे. हॅरी पाॅटर पुस्तक आणि सिनेमा दोघांच्याही आवडीचे विषय. एकदा दिनेश यांनी युट्यूबवरील मेटाव्हर्सवरील व्हिडिओ बघितला. त्यांना ही आयडिया खूप आवडली. आपणही असा मेटाव्हर्सचा सोहळा आयोजित केला तर, अशी त्यांना कल्पना सूचली. तसेच कोरोनामुळे लग्नसमारंभात पाहुण्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसाठी संख्यात्मक मर्यादा, प्रत्यक्ष नातेवाईक एकत्र जमल्यास संसर्गाचा धोका याचा विचार करुन दिनेश यांनी आपल्या रिसेप्शनसाठी मेटाव्हर्स हा उत्तम पर्याय ठरु शकतो असं वाटलं. त्यांनी ही कल्पना 'टारडिवर्स ' चे विग्नेश सेल्वराज यांना दिनेश यांनी आपली ही इच्छा सांगितली . विग्नेश हे मेटाव्हर्स प्रोजेक्टवर काम करतात. क्रिप्टोकरन्सी ज्या प्रक्रियेद्वारे चालते त्या पाॅलिगेन ब्लाॅकचेन टेक्नाॅलाॅजिचा वापर या मेटाव्हर्स प्रोजेक्टमधे केला जातो.
Image: Google
दिनेश यांनी मेटाव्हर्सवरील स्वागत सोहळ्यासाठी हॅरी पाॅटर ही थीम निवडली असून त्यातला प्रसिध्द किल्ला रिसेप्शनचं स्थळ म्हणून निवडलं आहे. 6 फेब्रुवारीला लग्न झाल्यावर हे जोडपं हा मेटाव्हर्सवर रिसेप्शनचा सोहळा आयोजित करणार आहे. या सोहळ्याची थीम हॅरी पाॅटर असल्यानं या सोहळ्यात सहभागी होणारी सर्व मंडळी या थीमच्या आपल्या आवडत्या पात्रांच्या अवतारात येणार आहे. नागानंदिनी यांच्या वडिलांचं मागील वर्षी एप्रिल मधे निधन झालं. पण मेटाव्हर्स या तंत्रज्ञानामुळे तेही एका अवतारात उपस्थित राहून दिनेश आणि नागानंदिनी या नवपरिणित जोडप्याला शुभ आशिर्वाद देणार आहेत. त्यासाठी त्यांचा फोटो वापरणार आहे. तो फोटो एका विशिष्ट अवतारासाठी वापरुन त्याद्वारे नागानंदिनीचे स्वर्गवासी वडील बोलू आणि वावरु शकणार आहे. नागानंदिनीसाठी हे माझ्याकडून लग्नातलं मोठं गिफ्ट असं याबाबत दिनेश सांगतात.
Image: Google
दिनेश यांनी ही आपल्या आगळ्या वेगळ्या रिसेप्शनची कल्पना नागानंदिनीला सांगितली तेव्हा तिला ती साॅफ्टवेअर इंजिनिअर असूनही दिनेश सांगत असलेली संकल्पना पटकन कळली नाही. पण दिनेश यांनी ती नीट उलगडून सांगितल्यावर आता तिलाही या सोहळा प्रत्यक्षात कसा पार पडतो याची उत्सुकता आहे. मेटाव्हर्सवर होणाऱ्या या रिसेप्शन सोहळ्याच्या बातम्या प्रसिध्द व्हायला लागल्या तशी ही संकल्पना आणखीनच चर्चेचा विषय होते आहे. विग्नेश म्हणतात, की दिनेश आणि नागानंदिनीचा रिसेप्शन सोहळा जेव्हा मेटाव्हर्सवर पार पडेल तेव्हा आणखी लोकांना त्याची स्पष्टता येईल. त्यानंतर यास्वरुपाच्या सोहळ्यांची मागणी नक्कीच वाढेल अशी विग्नेश यांची खात्री आहे. या सोहळ्यानंतर लगेचंच काही दिवसात व्हॅलेन्टाइन डे आहे. त्यानिमित्तानं या मेटाव्हर्सवरील सोहळ्याची मागणी वाढेल असा अंदाज विग्नेश वर्तवतात.
भारतातील मेटाव्हर्सवरील हा पहिला सोहळा आहे. याआधी मागच्या वर्षी मेटाव्हर्सवर फ्लोरिडा येथील ट्रेसी आणि डेव गॅगनाॅन यांनी लग्न केलं होतं. त्यांचे वैयक्तिक फोटो आणि त्यांनी त्यांच्या खाजगी समारंभात घातलेले कपडे यांचा वापर करुन लग्नासाठीचा त्यांचा डिजिटल अवतार तयार केला होता. आपल्या भारतात मेटाव्हर्सवर लग्न नाही पण रिसेप्शन हा सोहळा मेटाव्हर्सवर होणारा पहिला सोहळा आहे.