लहानपणी शाळेत जाताना किंवा अगदी कॉलेजला गेल्यावरही आपल्यासोबत आवर्जून असणारी गोष्ट म्हणजे स्टीलचा दोनपुडी किंवा तीनपुडी स्टीलचा डब्बा आणि आईच्या हातचे जेवण. शाळेत खेळून दमल्यावर या डब्याची किंमत काय हे आताचे कितीही महागडे जेवण नाही सांगू शकत. इतकेच काय तर अनेकदा कॉलेजला चालत गेल्यावर किंवा दिवसभर भटकून दमल्यावर आधार द्यायचा तो हाच स्टीलचा डब्बा. पोळी-भाजी आणि कधीतरी स्पेशल पदार्थ भरुन मिळणारा हा डबा आपल्या प्रत्येकाच्या आठवणीत असतो. आता कितीही फॅन्सी आणि महागडे डबे आले असले तरी या स्टीलच्या डब्याची सर कोणत्याच डब्याला येणार नाही.
आता हे सगळे आठवण्याचे कारण काय असा प्रश्न तुम्हाला एव्हाना पडला असेल. तर भारतात आवर्जून वापरल्या जाणारा हा डबा आता सातासमुद्रापार युरोपातही मिळतो. नुकताच एका महिलेने या स्टीलच्या डब्याचा फोटो आपल्या ट्विटरवर पोस्ट केला. मधुरा राव असे त्यांचे नाव असून सध्या त्यांना युरोपमधी एका स्टोअरमध्ये हा डबा बघायला मिळाला. त्यामुळे दोन दशकांपूर्वी त्या वापरत असलेल्या स्टीलच्या डब्याच्या आठवणी जाग्या झाल्या असे त्या म्हणतात. काही वर्षांपूर्वी प्लास्टीक किंवा इतर प्रकारच्या मटेरीयलचे डबे म्हणावे तसे उपलब्ध नसल्याने किंवा त्यावेळी स्टीलच्याच डब्याची फॅशन असल्याने प्रत्येकाकडे आवर्जून अशाप्रकारचे दोन पुडी किंवा तीन पुडी स्टीलचे डबे असायचेच.
Got bullied in school for brining lunch in this only to find it being sold in hipster stores in Europe two decades later pic.twitter.com/2MPEhJk2gC
— Madhura Rao (@madhurarrao) April 16, 2022
काळाच्या ओघात हे डबे काहीसे मागे पडले आणि आता वेगवेगळे फॅन्सी मटेरीयल वापरले जाऊ लागले. तर या पोस्टला रिप्लाय करताना अनेकांनी आपल्या स्टीलच्या डब्यासोबत असणाऱ्या आठवणींना उजाळा दिला आहे. स्टीलच्या डब्यात ठेवलेले अन्न प्लास्टीकपेक्षा चांगले असते मात्र त्यामध्ये गरम करता येत नाही असे काही जण म्हणत आहेत तर स्टीलचा डबा कसा गळायचा आणि सगळे पदार्थ त्यातून कसे बाहेर यायचे अशी आठवणही काही जण शेअर करताना दिसत आहेत. त्यामुळे या एका पोस्टवरुन ट्विटरवर स्टीलचा डबा की प्लास्टीकचा डबा यावर बरीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.