Join us  

प्लास्टिकच्या रियूज पाण्याच्या बाटलीत टाॅयलेट सिटपेक्षा ४० हजारपट जास्त बॅक्टेरिया, अमेरिकन संशोधकांचा दावा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2023 12:42 PM

Reusable Water Bottles Carry 40,000 Times More Bacteria Than A Toilet Seat, Finds Study : प्लास्टिकची एकच पाण्याची बाटली पुन्हा पुन्हा वापरताय? इन्फेक्शनचा धोका, पाण्यासाठी प्लास्टिक बाटली कशाला?

ऑफिसमध्ये, शाळा - कॉलेजात किंवा प्रवासात बाहेर जाताना आपण पाणी पिण्यासाठी सहसा पाण्याच्या प्लॅस्टिकच्या बॉटल्स विकत घेतो. बदलत्या काळानुसार काही लोक आपल्या आरोग्याची खूप काळजी घेतात. यासाठी काही लोक पाणी पिण्यासाठी खास विशिष्ट्य धातूंपासून बनलेल्या बॉटल्सचा देखील वापर करतात. बऱ्याचदा आपण बाहेर गेल्यावर कोल्ड्रिंक्स पिऊन त्याच्या बाटल्या साठवून, त्यात पाणी भरुन पिण्यासाठी त्याचा पुर्नवापर करतो.

महिनोंमहिने आपण या बाटलीचा वापर पाणी पिण्यासाठी करत असतो. वेळोवेळी ही बाटली स्वच्छ धुवून त्याचा वापर सुरू असतो. परंतु या पुर्नवापर करता येण्यायोग्य पाण्याच्या बाटल्यांचा वापर नक्की किती काळ करावा? या पुर्नवापर करतायेण्यायोग्य बाटलीतून वारंवार पाणी पिणे योग्य आहे का? या सगळ्या गोष्टींचा एक वैज्ञानिक अभ्यास करण्यात आला आहे. पाणी पिण्याच्या बाटलीपेक्षा आपल्या घरांतील टॉयलेट सीट जास्त स्वच्छ असते. वारंवार वापरल्या जाणार्‍या बाटल्यांमध्ये टॉयलेट सीटपेक्षा ४०,००० हजार पट जास्त बॅक्टेरिया असल्याचा दावा अमेरिकेतील एका संशोधनात करण्यात आला आहे(Reusable Water Bottles Carry 40,000 Times More Bacteria Than A Toilet Seat, Finds Study). 

सर्वप्रथम, पाण्याच्या बाटलीवर करण्यात आलेले संशोधन काय सांगते ते समजून घेऊ... 

अमेरिकेतील वॉटरफिल्टरगुरु डॉट कॉमच्या संशोधकांच्या टीमला एका संशोधनात आढळून आले आहे की वारंवार वापरल्या जाणार्‍या पाण्याच्या बाटल्यांमध्ये टॉयलेट सीटपेक्षा सरासरी सुमारे ४०,००० पट जास्त बॅक्टेरिया असू शकतात. संशोधकांच्या या टीमने बाटल्यांचा आणि त्याच्या झाकणांचा अभ्यास केला आहे. या अभ्यासादरम्यान त्या बाटल्यांच्या झाकणांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया असल्याचं त्यांना आढळून आलं. अभ्यासादरम्यान, संशोधकांनी बाटलीच्या वेगवेगळ्या भागांची तपासणी केली. त्यात बाटलीची कॅप, बाटलीचा वरचा तसेच तोंडाचा भाग, बाटलीचा तळाचा पृष्ठभाग यांचा समावेश होता. यामध्ये दोन प्रकारचे जिवाणू अधिक दिसले ते म्हणजे बॅसिलस (Bacillus) आणि ग्रॅम निगेटिव्ह (Gram-Negative). ग्रॅम निगेटिव्ह जीवाणू विविध प्रकारच्या संसर्गास कारणीभूत असतात त्याचप्रमाणे बॅसिलस बॅक्टेरियामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सारख्या समस्या उद्भवू शकतात.

या संशोधनात, बाटलीची तुलना स्वयंपाकघरातील इतर वस्तूंशी केली गेली, ज्यामध्ये असे आढळून आले की स्वयंपाकघरातील सिंकपेक्षा दुप्पट जंतू या बाटल्यांमध्ये असतात. यात संगणकाच्या माऊसपेक्षा चार पट अधिक बॅक्टेरिया आणि पाळीव प्राण्यांच्या पाण्याच्या भांड्यापेक्षा १४ पट अधिक बॅक्टेरिया असू शकतात. लंडनच्या इम्पिरियल कॉलेजचे मानववंशशास्त्रज्ञ डॉ. अँड्र्यू एडवर्ड्स म्हणाले की, या बाटल्यांमुळे माणसांचे तोंड आता जंतूंचे घर बनले आहे. ही पाण्याची बाटली बॅक्टेरियासाठी एक प्रजननाची जागा बनली असून ते खूप वेगाने वाढत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

या संशोधनानुसार पाण्याची बाटली रोज स्वच्छ करावी का? किंवा फक्त उन्हाळ्यातच स्वच्छ करणे आवश्यक आहे?

आपण आपल्या घरात ज्या पद्धतीने इतर भांडी वापरतो त्याच पद्धतीने पिण्याच्या पाण्याचा बाटलीचा देखील वापर करावा. प्रामुख्याने उन्हाळ्यात बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता जास्त असते. पण याचा अर्थ असा नाही की फक्त उन्हाळ्यातच बॅक्टेरियाची वाढ जास्त होते. कोणत्याही ऋतूत आपण पाण्याची बाटली वापरता तेव्हा ती साफ करायलाच हवी. शक्य असल्यास, पाण्याची बाटली काही काळ उन्हात वाळवायला ठेवा, त्यामुळे त्यातून येणारा वास निघून जातो आणि त्यात असलेले बॅक्टेरिया नष्ट होतात. अमेरिकेतील संशोधनाने असेही सुचवले आहे की, पाण्याची बाटली दिवसातून किमान एकदा साबण, गरम पाण्याने स्वच्छ करावी त्याचप्रमाणे आठवड्यातून देखील एकदा पाण्याची बाटली स्वच्छ करणे आवश्यक आहे.

टॅग्स :हेल्थ टिप्ससोशल व्हायरलआरोग्य