पोळ्या हा आपल्या रोजच्या जेवणातील एक महत्त्वाचा भाग असतो. महाराष्ट्रात तर पोळी-भाकरी हे मुख्य अन्न असल्याने घरात जास्त व्यक्ती असतील तर बऱ्याच पोळ्या कराव्या लागतात. इतर गोष्टींपेक्षा पोळ्या करायला थोडा जास्त वेळ लागतो. याचे कारण म्हणजे कणीक मळणे, मग त्याचे गोळे करणे, पोळी लाटणे आणि मग ती व्यवस्थित भाजणे अशा बऱ्याच प्रक्रिया असल्याने या कामात बऱ्यापैकी वेळ जातो. इतकंच नाही तर पोळ्यांमुळे पोळपाट, लाटणं, ओटा असं सगळंच खराब होतं. पोळ्या केल्यावर आजुबाजूला पीठ सांडतं, त्यामुळे पोळ्या झाल्यावर ओटा पाण्याने किंवा ओल्या कापडाने स्वच्छ करावा लागतो (Roti box Viral Video For Easy Roti Making Social Viral).
सकाळी आपण एकावेळी चहा, नाश्ता, पोळ्या, भाजी अशा खूप गोष्टी करत असतो. पोळ्यांसाठी सकाळच्या घाईत आपला बराच वेळ जातो. पण कणीक सांडून ओट्यावर राडा होऊ नये यासाठी एक भन्नाट कल्पना बाजारात आली आहे. आपण पोळ्या ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे डबा वापरतो त्याचप्रमाणे पोळ्या लाटण्यासाठीही एका अनोख्या अशा डब्याची निर्मिती करण्यात आली आहे. रोटीबॉक्स असेच या बॉक्सचे नाव असून तो साधारणपणे ४ ते ५ हजारांच्या घरात उपलब्ध आहे. पोळ्यांना लावण्यासाठी लागणारे कोरडे पीठ, पोळपाट हे आपण यामध्येच ठेवू शकत असल्याने पोळ्या केल्यानंतर आवराआवरी करण्याची आवश्यकता नाही.
हा बॉक्स नॉन स्टीक पद्धतीचा असल्याने यावर पोळ्या लाटण्याचे काम सोपे होते असे कंपनीचे म्हणणे आहे. अशाप्रकारचा बॉक्स वापरणे आरोग्याच्या दृष्टीने किती चांगले असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. पण जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करणार्या अँटी-मायक्रोबियल ऍडिटीव्हसह हा बॉक्स तयार केल्यामुळे त्याची स्वच्छता राखणे सोपे होणार आहे. काळ्या रंगाचा चपटा आणि झाकण असलेला तसेच झाकणाला २ फोल्ड असलेला हा बॉक्स वापरणे काहीसे सोयीचे असू शकते असे त्याकडे पाहून वाटते. मुख्य म्हणजे पोळ्या केल्यानंतर होणारा पसारा आवरण्याचा वेळ आणि कष्ट यामुळे नक्कीच वाचतील. ऐनवेळी पोळी हवी असेल तर हा बॉक्स उघडून पोळी करुन झटपट खाता येऊ शकते.