आपला देश प्रत्येकालाच प्रिय असतो. युद्धजन्य स्थितीत देशाला वाचवण्यासाठी काहीही करण्याची नागरिकांची तयारी असते. रशिया युक्रेन (Russia ukraine wor) युद्धाला सुरूवात झाल्यानंतर देशभक्तीनं भरलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक, एका लहान मुलीचा व्हिडिओ सध्या व्हायरल आहे. मात्र आता सोशल मीडिया फॅक्ट चेकमध्ये असे समजतेय की, तो व्हिडिओ युक्रेनचा नसून एका पॅलेस्टाइन मुलीचा आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी आपल्या देशाला वाचवण्यासाठी सैनिकाबरोबर एकटी लढायला तयार झाली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक सैनिक शस्त्र घेऊन उभा असल्याचे दिसत आहे. एक लहान मुलगी त्याला मारायला लागते. त्या चिमुरडीला मरणाची भीती नाही. तिला आपल्या मातृभूमीसाठी लढायचे आहे. ती वारंवार सैनिकाला देश सोडून जाण्यास सांगत आहे.
शिपाई शांतपणे उभा आहे. तो थोडा वेळ हसतो, मग निघून जातो. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर लोक भावूक होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजण चिमुरडीचे कौतुक करत आहेत तर काहीजणांनी धाडसी मुलीला सलाम ठोकला आहे.
मात्र इश्माइल नावाच्या एका ट्विटर युजरने केलेल्या ट्विटनुसार हा व्हिडिओ पॅलेस्टिनी मुलीचा आहे. इस्त्रायली सैनिकाच्या समोर ही मुलगी २०१५मध्ये उभी ठाकली होती. तिच्या घरी आलेल्या इस्त्रायली सैनिकासमोर ती उभी ठाकली होती. अहमद तामिमी असं त्या मुलीचं नाव. तिला सैनिकांनी तिला मारलंही होतं. पुढे तिला ८ महिन्यांचा तुरुंगवासही भोगावा लागला. ही एकच मुलगी नाही, तर त्याकाळातही सैनिकांना जाब विचारणाऱ्या अनेक मुलांचे व्हिडिओ सध्या व्हायरल आहेत.