लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी वेगवेगळे देश विविध योजना राबवत असताना रशिया हा देश मात्र देशाच्या लोकसंख्या वाढीसाठी (to increase population) प्रयत्न करत आहे. कोरोना संसर्गात रशियाला मोठ्या जीवितहानीला सामोरं जावं लागलं. तसेच युक्रेनसोबत सुरु असलेल्या युध्दातही रशियाचे 50 हजार सैनिक मारले गेल्याचे माध्यमांमध्ये प्रसिध्द होत आहे. या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी लोकसंख्या वाढीसाठी एक अजब वाटणारी योजना जाहीर केली आहे. पुतिन यांनी जाहीर केलेल्या या नवीन योजनेनुसार 10 मुलांना जन्माला घालून त्यांना जिवंत ठेवण्यात यशस्वी होणाऱ्या महिलांना सरकारतर्फे दर महिन्याला 13 लाख रुपये देण्यात येणार आहे. 10 मुलांना जन्म देणाऱ्या, त्यांना जिवंत ठेवणाऱ्या स्त्रीला 'मदर हिरोईन' म्हणून ओळखलं जाणार आहे.
Image: Google
रशियात जास्त सदस्य असलेल्या मोठ्या कुटुंबाचा राष्ट्राध्यक्ष पुतिन हे देशभक्त म्हणून गौरवानं उल्लेख करतात. रशियात ज्या महिलांना दहापेक्षा जास्त मुलं होतात त्यांना विशेष पुरस्कारानं गौरवलं तर जातंच सोबतच त्यांचा उल्लेख मदर हिरोईन म्हणूनही केला जातो. लोकसंख्या वाढीसाठी रशियन सरकारनं विविध योजना राबवल्या, अनेक निर्णय घेतले पण त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचं लक्षात आल्यानंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी लोकसंख्या वाढीसाठी नवीन योजना जाहीर केली आहे. रशियाच्या बाहेरील लोकांना ही नवीन योजना अजब गजब वाटत आहे तर प्रत्यक्ष रशियातीन राजकारण विश्लेषक आणि तज्ज्ञ राष्ट्राध्यक्षांच्या या निर्णयावर टीका करत आहे. अध्यक्षांनी हा निर्णय नैराश्यातून घेतल्याचं विश्लेषण रशियात केलं जात आहे. तर जनतेला या योजनेतला गोंडसपणाही दिसत आहे आणि यातलंही आव्हानही जाणवत आहे.
Image: Google
नवीन योजनेनुसार ज्या महिला 10 मुलं जन्माला घालतील त्यांना दहा लाख रुबल म्हणजेच साडे तेरा हजार पौंड ( 13 लाख रुपये) मिळणार आहे. नुसती मुलं जन्माला घालायची नाही तर त्यांचं पालन पोषण करुन त्यांना जगवणं ही महत्वाची अट यात समाविष्ट आहे. दहाव्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला त्या महिलेला रशियन सरकार 13 लाख रुपये दर महिन्याला देणार आहे. पण तोपर्यंत एवढी मुलं कशी वाढवायची, त्यांचं पालन पोषण कसं करायचं, एवढ्यांना राहाण्यासाठी राहातं घर पुरेसं पडेल का असे प्रश्न सामान्य रशियन जनतेला पडले आहे. दर महिन्याला 13 लाख रुपये, मदर हिरोईन ही पदवी हे सर्व म्हणायला छान वाटत असलं तरी ते मिळेपर्यंतचं आव्हान पेलणं कठीण असल्याचं रशियन जनतेचं मत आहे.