लहान मुलांसकट मोठ्या माणसांनाही बटाट्याचे पराठे (Aloo Paratha lover) मनापासून आवडतात. शिवाय ते पौष्टिकही असतात. त्यामुळे बऱ्याच घरांमध्ये हा पदार्थ नेहमीच केला जातो. नेहमी पराठे करूनही कधी त्याचं प्रमाण बिघडतं... कधी पराठा (Aloo Paratha recipe) लाटताना सारण बाहेर येतं आणि पोळपाट- लाटणं सगळंच चिकट होऊन जातं. तर कधी तव्यावर भाजताना पराठा फुटतो. आता नेहमीची सवय असूनही अनेक जणींचा हा बेत कधी कधी फसतो. पण इथे एक रशियन तरुणी मात्र अगदी सराईतपणे बटाट्याचे पराठे लाटताना दिसत आहे (Russian woman make perfect round shape aloo paratha). त्यामुळेच तर नेटकरी तिचा हा व्हिडिओ (viral video) पाहून तिचं तोंडभरून कौतूक करत आहेत.
Ekaterina Raman असं या तरुणीचं नाव आहे. ती मुळची रशियाची रहिवासी असून व्यवसायाने व्हिडिओ क्रियेटर आहे. कामानिमित्त तसेच पर्यटनासाठी ती भारतात आली असून आतापर्यंत ती भारतातली अनेक पर्यटनस्थळं फिरली आहे. सध्या ती मध्यप्रदेशात राहात आहे. अर्थातच ही सगळी माहिती तिच्या foreignerinindia या इन्स्टाग्राम पेजवरून मिळते आहे. या पेजवरच तिने तिचे बरेच फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. नुकताच तिने बटाट्याचे पराठे करण्याचा व्हिडिओ शेअर केला असून तिचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
ती म्हणते आहे की तिने पहिल्यांदाच पराठे केले आहेत. पण ती ज्या सराईतपणे पराठे करते आहे, ते पाहून तिच्या स्वयंपाकातल्या कौशल्याचं खरोखरंच कौतूक वाटतं. सुरुवातीला तिने अगदी व्यवस्थित कणिक मळली. त्यानंतर बटाटे उकडून त्याचं सारण तयार केलं आणि नंतर अतिशय छान अगदी गोल गलगरीत पराठे लाटले. परदेशी असूनही ती एवढे गोलाकार पराठे कसे लाटू शकतेय, याबाबत अनेक कमेंट्समधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
ये कुछ भी कर सकती है! मोडक्या डुगडुगत्या लाकडी पुलावरुन सुसाट गाडी पळवणारी बुलेट राणी..पाहा व्हिडिओ
६ पराठे आणि टाेमॅटो सॉस बनवला असं ती सांगते आहे. पण तिच्या वाटीत जो काही पदार्थ आहे, तो टोमॅटो सॉसपेक्षा टोमॅटोच्या भाजीसारखाच जास्त दिसतो आहे. ६ पराठ्यांपैकी शेवटचा पराठा जरासा जास्तच भाजला गेलाय, पण तरीही तिने केलेला प्रयत्न मात्र निश्चितच लाजवाब आहे. त्यामुळेच तर तिचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून त्याला हजारो लाईक्स मिळाले आहेत.