मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी देवच. भारतातच नाही तर जगभरात सचिनचे चाहते आहेत. आपल्या खेळीने रसिकांच्या मनावर अधिराज्य कराणारा सचिन गेल्या काही दिवसांत कुटुंबात छान रमलेला दिसतो. सचिन सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टीव्ह असून काही ना काही व्हिडिओ किंवा फोटो शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. मकर संक्रांतीच्या निमित्ताने सचिनने नुकताच एक खास व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये त्याने सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. इतकेच नाही तर सचिनने यामध्ये तीळगूळ करण्याची सोपी रेसिपी सांगत आपल्या कुटुंबियांसाठी झक्कास असा तीळगूळही तयार केला आहे ( Sachin Tendulkar Making Tilgul Viral Video of Recipe).
क्रिकेटच्या मैदानावर भल्याभल्यांना गारद करणारा सचिन किचनमध्येही तितक्याच तल्लीनतेने रमलेला दिसतो. संक्रांतीच्या निमित्ताने सचिनने स्वत: तीळगूळ बनवण्याचा घाट घातला असून अगदी सोप्या पद्धतीने त्याने झटपट असे तीळगूळाचे लाडू तयार केले आहेत. आपल्या घरातल्या सगळ्यांसाठी हे सरप्राईज आहे हेही सचिन व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो. हे लाडू आपण कसे तयार केले हेही तो अतिशय छान पद्धतीने आपल्या चाहत्यांना सांगत आहे. तीळगूळ बनवण्याचा आपला हा पहिलाच प्रयत्न असल्याचेही त्याने कॅप्शनमध्ये लिहीले आहे.
काय आहे सचिनची रेसिपी
सुरुवातीला एका पॅनमध्ये तीळ भाजून घ्यायचे. मग डाळं, किसलेलं खोबरं आणि दाणे बारीक गॅसवर भाजून घ्यायचे. दुसऱ्या पॅनमध्ये गूळ बारीक गॅसवर गरम करायला ठेवायचा, त्यामध्ये घरचं तूप घालायचं. आणि हा गूळाचा पाक भाजलेले तीळ, दाणे, डाळं आणि खोबरं यामध्ये घालायचा. हे मिश्रण एकजीव करुन गॅस बंद करायचा आणि मग हाताला तूप लावून याचे छान लाडू वळायचे. सचिनने केलेले हे लाडू खमंग झाल्याचे व्हिडिओतूनही दिसते.
आपल्या घरात आई, काकू, बायको अंजली, बहिण-भाऊ यांना देण्यासाठी आपण हे लाडू बनवत असल्याचेही सचिन सांगतो. इन्स्टाग्रामवर सचिनने हा व्हिडिओ शेअर केला असून अवघ्या एका तासात लाखो जणांनी त्याची पोस्ट लाईक केली आहे. तर अनेकांनी त्याला यावर सचिनचे कौक करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सचिन फूडी असल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. कधी मिसळ खातानाचा व्हिडिओ शेअर करतो तर कधी आणखी कोणत्या रेसिपीबद्दल तो भरभरुन बोलतो. नुकताच त्याने आपल्या बागेतील एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यावेळी त्याने वांगी, शिमला मिरची, हरभरा या भाज्या घरच्या बागेत पिकवल्याचे दाखवले होते. यावेळी त्याने बोलता वांग्याच्या भरताची रेसिपीही सांगितली होती. घरात पिकवलेल्या भाज्या खाणं कसं आनंददायी असतं हेही त्याने या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं.