आईची महती सांगणारा आणि तिने ठरवलं तर ती वाट्टेल ते करु शकते हे सिध्द करणारा हा फोटो. उबर कॅबमधील प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने तो शेअर केला आहे. या फोटोमध्ये उबर कारचालक महिला आपल्या चिमुकल्या मुलीला सोबत घेऊन कॅब चालवते आहे. सध्या हा फोटो व्हायरल झाला असून, अनेकांनी या फोटोवर कमेंट करत त्या महिलेचं कौतुक केलं आहे.
हा फोटो CloudSEK कंपनीचे सीईओ राहुल सासी यांनी लिंक्डइन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. त्यांनी हा फोटो सोशल मिडीयावर शेअर करत म्हटलं, ‘’ जेव्हा मी कॅब बुक केली तेव्हा असे वाटले नव्हते की एक आई ड्रायवर बनून येईल.’’ राहुल याने पुढे सांगितले, ‘’ जेव्हा कॅब माझ्यासमोर येऊन थांबली आणि मी आतमध्ये बसलो, तेव्हा माझ्यासमोर महिला ड्रायवर होती. विशेष म्हणजे तिच्या बाजूच्या सीटवर एक छोटी मुलगी शांत झोपली होती.’’
प्रवासादरम्यान राहुलला महिलेकडून तिच्यासंदर्भात जाणून घ्यायचे होते. त्यांनतर राहुलने बोलायला सुरुवात केली. त्यात त्या महिलेने तिचे नाव नंदिनी आहे असे सांगितले, तिला एक व्यावसायिक महिला बनायचे होते. याआधी नंदिनीने काही वर्षांपूर्वी फूड ट्रकही सुरू केला होता, पण कोरोनाने सर्व काही उद्ध्वस्त केले. व्यवसायही चालू शकला नाही आणि जमा झालेले सर्व भांडवलही त्यात खर्च झाले. पुन्हा स्वत:च्या पायावर उभी राहण्यासाठी तिने कॅब चालवण्यास सुरुवात केली.
बंगळूरूमध्ये ड्राइविंगचं काम ती बारा तास करते. तिच्या मते कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते. नंदिनीला पुन्हा एकदा आपल्या स्वप्नांची उंच भरारी घ्यायची आहे. महिला व्यावसायिक बनण्यासाठी ती खूप मेहनत घेत आहे. नंदिनीचा हा खडतर प्रवास आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी असलेली धडपड प्रेरणादायी आहे. विशेष म्हणजे उबरचे कंट्री हेड प्रभजीत सिंग यांनीही नंदिनीला मदत करण्यासाठी संपर्क साधला आणि तिला पाठिंबा देत तिचे कौतुक केले.