समाजात अनेक धक्कादायक गोष्टी घडत असतात. स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत दिवसागणिक वाढ होत आहे. विकृत लोकांना कायद्याचा धाक राहिलेला दिसत नाही. अशातच स्त्री-पुरुष समानतेवर देखील भाष्य केलं जात आहे. याच दरम्यान गेल्या कित्येक वर्षांपासून महिलांसाठी लढणारा एक पुरुष सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे. महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी त्याने पुढाकार घेतला.
सचित पुराणिक असं या तरुणाचं नाव असून त्याने लिंगभेद आणि हिंसाचाराच्या विरोधात उघडपणे बोलण्याचा निर्णय घेतला. सचितने महिलांचे कपडे परिधान करून त्यांना कोणत्या गोष्टींना सामोर जावं लागतं हे दाखवून दिलं आहे. स्त्री-पुरुष समानतेवर चर्चा करण्यात पुरुष मागे आहेत हे त्याने पाहिलं आणि ते बदलण्याचं ठरवलं. पुरुषांनी समानतेसाठी खऱ्या अर्थाने खंबीरपणे उभं राहण्यासाठी पितृसत्ताक व्यवस्थेचा सामना केला पाहिजे असं स्पष्टपणे म्हटलं.
महिलांचं सार्वजनिक स्थान पुन्हा मिळवणाऱ्या नेहा सिंग आणि देविना कपूर यांच्या 'व्हाय लॉइटर' मोहिमेने सचित पुराणिकला प्रेरणा दिली. पुरुष या चर्चेचा भाग का नाहीत? असा प्रश्न त्याने विचारला. त्याने हे सर्व बदलण्याचा दृढनिश्चय केला. व्हाय लॉइटर मोहिमेने २०१५ मध्ये "वॉक लाईक अ वुमन" नावाचा एक विशेष वॉक केला, जिथे २० हून अधिर पुरुष क्रॉस-ड्रेस घालून पृथ्वी थिएटर ते जुहू बीच पर्यंत चालत गेले. यामध्ये पुरुषांनी महिनांना दररोज कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
सचितही या वॉकमध्ये सहभाही झाला होता. त्याने इतरांना यासाठी प्रोत्साहन दिलं. सचित इथेच थांबला नाही तर एक नाट्यनिर्माता म्हणून पितृसत्ताक व्यवस्था ही पुरुषांना महिलांसाठी बोलण्यापासून का रोखते याचा त्याला सखोल अभ्यास करायचा होता. यातूनच लोइटरिंगचा जन्म झाला, एक नाटक जे लिंगभेदाशी संबंधिक गोष्टींना आव्हान देतं आणि पुरुषांना अन्यायाविरुद्ध सक्रियपणे लढण्यास उद्युक्त करतं आणि महिलांचा आवाज बुलंद करतं.
लोइटरिंग का? कारण सार्वजनिक ठिकाणी महिलांपेक्षा पुरुष मुक्तपणे फिरतात. म्हणूनच त्याने हा शब्द वापरून गोष्टच बदलली आणि ती समानतेच्या एका क्रांतिकारी कार्यात पुढे नेली. भारत आणि त्यापलीकडे त्याच्या कामगिरीद्वारे सचितला आशा आहे की, अधिकाधिक पुरुष पुढे येतील आणि या चळवळीत सामील होतील. कारण स्त्री-पुरुष समानता हा केवळ महिलांचा मुद्दा नाही, तर तो प्रत्येकाचा लढा आहे.