कमी शब्दात प्रभावीपणे व्यक्त होण्याचं साधन म्हणजे ट्वीटर. अनेकांना इतर कोणत्याही समाज माध्यमांपेक्षा ट्वीटरवर आपल्या प्रतिक्रिया देणं, भावना व्यक्त करणं आवडतं. आपलं ट्वीटर (tweeter) अकाउण्ट हॅण्डल करणं, ट्वीट करणं, कोणाचं ट्वीट रिट्वीट (retweet) करणं ही सामान्य बाब आहे. पण आपल्याला साधी वाटणारी ही गोष्ट सौदी अरेबियासारख्या देशात कडक शिक्षेस पात्र ठरणारी आहे. या देशात मुळातच व्यक्त होण्यावर, अभिव्यक्तीवर नाना तऱ्हेची बंधनं. त्यात महिलांवर जरा जास्तच निर्बंध. सौदी अरेबियातील (saudi arabia) एका महिलेला एक ट्वीट रिट्वीट केलं म्हणून तब्बल 34( sentence prison for 34 years) वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली. जगभरात या शिक्षेविषयी आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
Image: Google
सौदी अरेबियातील सलमा अल शेहाब ही 34 वर्षांची महिला. ती इंग्लडमधील लीड्स युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत आहे. सुट्यांसाठी म्हणून ती सौदी अरेबियातील आपल्या घरी आली. सलमा ही पूर्वीपासूनच मुक्त विचारांची. घरी आल्यानंतर सलमानं सौदी अरेबियातील क्रांतिकारकांना ट्वीटरवर फाॅलो केलं. सलमानं सौदी अरेबियातील महिला हक्कांवर काम करणाऱ्या लौजेन अल हथलौल यांचं एक ट्वीटला रिट्वीट केलं. ही बाब सौदी अरेबियातील व्यवस्थेला खटकली. तेथील विशेष दहशतवादी न्यायालयानं सलमाला तिचं रिट्वीट करणं समाजात अशांतता पसरवणारं असून हा गुन्हा आहे असं म्हणत त्याची शिक्षा म्हणून 34 वर्षांचा तुरुंगवास ठोठावला.
Image: Google
लौजेन अल हथलौल या सौदी अरेबियात महिलांना गाडी चालवण्याचा अधिकार मिळावा यासाठी लढत आहेत. यासंदर्भात त्यांनी केलेल्या एका ट्वीटला सलमानं समर्थन देत रीट्वीट केलं. सलमानं अशा पध्दतीनं रीट्वीट करुन समाजातील शांति, राष्ट्रीय सुरक्षा भंग केल्याचे आरोप न्यायालयानं तिच्यावर ठेवले. आधी न्यायालयानं तिला यासाठी 6 महिन्यांची शिक्षा सुनावली होती. पण पुन्हा सुनावणी घेत ही शिक्षा वाढवून 34 वर्षांची करण्यात आली. यापूर्वीही सलमाला सौदी अरेबियन सरकारनं इंटरनेटचा चुकीचा वापर केला म्हणून 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली होती.
Image: Google
सलमा अल शेहाब डेंटल हाईजीनिस्ट आणि मेडिकल एज्युकेटर आहे. तसेच ती इंग्लडमधील विद्यापिठात पीएचडीही करत आहे. 34 वर्षांची सलमा दोन मुलांची आई आहे. 34 वर्षांचा तुरुंगवास भोगल्यानंतर पुढील 34 वर्ष सलमावर परदेशात जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सलमाला झालेल्या या शिक्षेबद्दल जगभरात निषेध नोंदवला जात आहे. अभिव्यक्तीच्या साधनांचा सुकाळ असताना एखाद्या विषयावर मत व्यक्त करणं, एखाद्याच्या मताला प्रतिसाद देणं एवढं गंभीर असू शकतं हे सौदी अरेबियातील सलमाला झालेल्या शिक्षेवरुन लक्षात येतं.