"छडी लागे छम छम विद्या येई घम घम, छम... छम..." आपल्या बालपणी आपण हे गाणं बऱ्याचदा ऐकलं असेल. शाळेतल्या बाईंची छडी हातावर बसल्याशिवाय अभ्यास येणार नाही... अशा अर्थाचं हे गाणं... आपल्यापैकी प्रत्येकानेच शाळेत असताना लहानपणी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे बाईंचा मार खाल्लाच असेल. कधी अभ्यास केला नाही म्हणून, कधी वर्गात काही खोडी केली, गृहपाठाच्या वह्या अपूर्ण ठेवल्या, गणिताचे उत्तर चुकले अशा अनेक कारणांमुळे आपण शाळेत बाईंचा धम्मक लाडू खाल्लेला असतो.
आपण केलेल्या चुकीमुळे किंवा खोडकरपणामुळे आपल्याला शाळेत शिक्षा होत असते. परंतु शाळेची फी दिली नाही म्हणून बाईंनी एक अजबच शिक्षा विद्यार्थ्यांना केली असल्याची एक घटना समोर येत आहे. मुंबईतील एका शाळेविषयी व्हायरल चर्चा आहे. शाळेतील एका शिक्षकाने मुलांनी उद्या शाळेत येताना फी आणायला विसरू नये म्हणून केलेल्या शिक्षेची सर्वत्र चर्चा होत आहे. बघूया हे नेमकं प्रकरण आहे तरी काय?(School has kids write, ‘I will not forget to bring ₹300 tomorrow’, 30 times).
नेमकं प्रकरण आहे तरी काय ?
शाळा सुरु झाली की, शाळेचा युनिफॉर्म, वह्या - पुस्तके, ओळखपत्र - डायरी यांसारख्या मुलांना दररोज लागणाऱ्या विविध गोष्टी शाळा पुरवते. तसेच या बदल्यात शाळा त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टींची फी आकारत असते. अशीच काहीशी घटना एका मुंबईतील शाळेत घडली आहे. मुंबईतील एका शाळेने सुमारे पाच ते आठ विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्या डायरी आणि ओळखपत्रांचे शुल्क भरण्यासाठी जवळ येत असलेल्या अंतिम मुदतीची आठवण करून देण्याचे ठरवले. परंतु ही सूचना देण्यासाठी त्यांनी ज्या मार्गाचा अवलंब केला तो मार्ग चुकीचा होता. "डायरी आणि ओळखपत्रांचे एकूण शुल्क ३०० रुपये मी उद्या आणायला विसरणार नाही." असे मुलांना ३० वेळा त्यांच्या वहीत लिहिण्याची शिक्षा बाईंनी दिली होती.
ऑर्डर केलेला पिझ्झा २ इंचांनी छोटा दिला म्हणून तक्रार करणारी 'ती' होतेय व्हायरल...
या सगळ्या घडलेल्या प्रकाराबद्दल एका विद्यार्थ्याच्या पालकाने म्हटले की, "आमच्या मुलांना ही दिलेली शिक्षा योग्य नाही". ही शिक्षा दिल्यामुळे माझा लहान मुलगा फारच दुखावला गेला आहे, या कारणामुळे तो आता शाळेत यायला देखील तयार नाही. शिक्षेला सामोरे गेलेल्या आणखी एका मुलाच्या पालकाने म्हटले की, “मुलांना या वाक्याऐवजी पाच वेळा पाठ्यपुस्तकातून परिच्छेद लिहायला लावता आला असता, तर समजू शकत होतो. माझ्या मुलाचा अपमान झाला आहे. या घटनेमुळे झालेल्या त्याच्या भावनिक त्रासाची भरपाई कोण देणार?" अशा प्रश्न करत त्यांनी शाळेकडून झालेल्या या कृत्याला विरोध दर्शविला आहे.