जम्मू-काश्मीर हे अतिशय सुंदर दऱ्यांनी वेढलेले राज्य आहे, आजही याची ओळख धरतीवरील स्वर्ग अशी आहे. जम्मू काश्मीरला जाण्याचं स्वप्न सगळ्यांचच असतं. परंतु, आजही या केंद्रशासित प्रदेशात असे अनेक भाग आहेत, जिथे लोक बंदुकीच्या सावलीत राहतात. महिलांच्या बाबतीतही जम्मू काश्मीरमध्ये वेगळी परिस्थिती नाही. अनेक ठिकाणी परंपरावादी विचार महिलांना घराबाहेर पडण्यापासून रोखतात. मात्र, सीमा देवी यांनी परंपरेला न जुमानत आपल्या पतीला आणि कुटुंबाला हातभार लावण्याचा विडा उचलला आहे. तिने पुरुषांसाठी मानले जाणारे काम म्हणजेच इलेक्ट्रिक रिक्षा चालवण्याचे काम हाती घेतलं आहे. त्या पहिल्या महिला ई-रिक्षा चालक बनल्या असून, त्यांची संगर्षमय कथा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काय आहे त्यांची कथा जाणून घेऊयात.
कोण आहेत सीमादेवी?
सीमा देवी या जम्मू-काश्मीरच्या नगरोटा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. एका साध्या गृहिणीप्रमाणे त्या आपल्या कुटुंबाची काळजी घेतात. सीमा देवी यांना तीन मुले आहेत. सीमादेवीच्या पतीसाठी संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले होते. पती रात्रंदिवस काबाडकष्ट करत असल्याचे पाहून सीमादेवी यांनीही कुटुंबाच्या गरजांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ई रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कौटुंबिक परिस्थितीमुळे घेतला निर्णय
सीमा देवी यांना 15 वर्षांचा मुलगा आहे, तर 14 आणि 12 वर्षांच्या दोन मुली आहेत. महागाई खूप वाढत चालली आहे. यासह मुलांना चांगले शिक्षण देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र, पतीच्या कमाईवर कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नव्हता. त्यामुळे सीमा यांनी कुटुंबाला हातभार लावण्याचा निर्णय घेतला.
रिक्षा चालवायला सुरुवात
कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी सीमादेवींनी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. सीमा देवी गेल्या काही महिन्यांपासून नगरोटा परिसरात रिक्षा चालवतात. समाजाची पर्वा न करता सीमा आपले काम करते. त्यांनी आपल्या पतीसह 30 हजारांचे कर्ज घेतले आहे. 3000 च्या EMI वर ई रिक्षा घेतली. नवऱ्याने सीमाला रिक्षा कशी चालवायची हेही शिकवले. पतीचे साथ असले की महिला नक्कीच यशस्वी होतात, याचं उत्तम उदाहरण म्हणजे सीमा देवी आहेत.
या युगात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. महिला कोणत्याही क्षेत्रात कमी पडत नाहीत. अनेक महिला विमान उडवतात, ट्रेन चालवतात, रिक्षा चालवतात. सीमा देवी या प्रत्येक स्त्रीसाठी एक प्रेरणा बनल्या आहेत. त्यांना नोकरी मिळत न्हवती. परंतु, आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी त्यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. कुटुंबाचा गाडा हाकत सीमा आर्थिक बाजू उभी करण्यासाठी रिक्षा चालवत आहे. त्यांच्या या कार्यासाठी सर्वत्र कौतुक होत आहे.