असं म्हणतात की प्रत्येक मोठ्या माणसामध्ये एक लहान मुल लपलेलं असतंच. कर्तव्य, जबाबदाऱ्या, टेन्शन्स या सगळ्यांमध्ये ते आत कुठेतरी दडून जातं खरं. पण कधी आापल्या आवडीच्या काही वस्तू समोर आल्या किंवा काही प्रसंग घडले की अगदी आत आत दडवून ठेवलेलं ते बालमन बाहेर येतंच.. म्हणूनच तर कधी कधी खूप आनंदात किंवा खूप भावनिक झालेली मोठी माणसं लहान मुलांसारखं वागताना आपण बघतो. वय कितीही वाढलं तरी आपल्या आतलं ते लहान मुल जिवंत असेल, तर प्रत्येक गोष्टीचा आनंद घेता येतो असं म्हणतात. तसंच काहीसं या आजी- आजोबांचं झालं आहे. (Senior citizens enjoying in the park)
pala_achayan_achayathees या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलेला हा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. केरळमधील कोणत्या तरी शहरातला हा व्हिडिओ असून तो एका छानशा बगिचामध्ये चित्रित करण्यात आला आहे. नाना- नानी पार्क (nana- nani park) आजकाल अनेक ठिकाणी असतात. बहुतेक तशाच एखाद्या पार्कमधला हा व्हिडिओ असावा, असं वाटतं. या आजी- आजोबांचं नाव गाव काही माहिती नसलं, तरी नेटिझन्सला ते फारच आवडले आहेत, हे त्यांच्या व्हिडिओला मिळालेल्या प्रतिसादावरून लक्षात येतं.
या व्हिडिओमध्ये शुभ्र पांढऱ्या साड्या नेसलेल्या २ आज्या दिसत आहेत. त्यांचे झोके एकमेकींच्या आजुबाजुलाच आहेत. त्यापैकी एक आजी अगदी सावकाश, जपून जपून, नाजूकपणे झोका घेत आहेत. याच्या अगदी उलट स्वभावाच्या दुसऱ्या आजी दिसतात. कारण त्यांचा उत्साह खूपच जबदरस्त असून त्याच उत्साहाच्या भरात वय विसरून त्या शक्य होईल तेवढं जोरजोरात झोके घेत आहेत. त्या दोन्ही आजींच्या समोरच एक डुलणारा घोडा आहे. या घोड्यावर एक आजाेबा बसलेले आहेत आणि अगदी मनसोक्तपणे ते घोड्यावर डोलण्याचा आनंद घेत आहेत. वारंवार बघावं, एवढं सुंदर ते सगळं दृश्य आहे.