किती छान लांबसडक केस आहेत नाही? काय करतेस केसांसाठी असं आपण अगदी सहज एखाद्या मैत्रीणीला म्हणतो. मग तीही सुरुवातीला थोडा भाव खाते आणि मग ती लावत असलेलं तेल, शाम्पू यांची नावं सांगते. केस वाढण्यासाठी काय काय करता येईल याचा आपण नेहमीच शोध घेत असतो. मग कधी इंटरनेटवर सर्च करुन तर कधी आणखी कोणाला विचारुन आपण ते सगळे उपाय ट्राय करतो. पण बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानच्या फॅनने चक्क मित्र, मैत्रीणी किंवा गुगलला आपली ही शंका न विचारता किंग खानलाच केस वाढण्यासाठी काही टिप्स देतोस का असं विचारलं (Shahrukh Khan Pathan Movie Look Hairstyle).
चार वर्षांच्या प्रतिक्षेनंतर किंग खानचा ‘पठाण’ चित्रपट आज सिनेमागृहात प्रदर्शित झाला आणि त्यामधला त्याचा लूक चर्चेचा विषय बनला. शाहरुखचा यामधील लूक त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. यामध्ये त्याने केस वाढवले असून फैजन मालिक नाव असलेल्या एकाने ट्विटर युजरने शाहरुखला लांब केसांसाठी काही टिप्स दे असे म्हणत टॅग केले आहे. तेव्हा शाहरुखनेही त्यावर दिलेले उत्तर अतिशय अनपेक्षित आहे. शाहरुखनेही अगदी मजेशीर पद्धतीने हे ट्विट रीट्विट करत चाहत्याला उत्तर दिले आहे.
Mummy ji se sar par tel ki maalish karwao… https://t.co/EuBIR3YJ0p
— Shah Rukh Khan (@iamsrk) January 24, 2023
केस वाढवायचे तर ‘आईकडून डोक्याला तेलाने मालिश करुन घे’ असा सल्ला शाहरुखने दिला आहे. हजरजबाबीपणा दाखवत त्याने दिलेल्या या उत्तराचेही सोशल मीडियात कौतुक झाले आहे. तर केसांसाठी शाहरुखने कोणतं तेल वापरलं? केस खरे आहेत की विग लावले असे हेअरस्टाईलवरुन एकाहून एक प्रश्न चाहत्यांनी शाहरुखच्या या पोस्टवर विचारले आहेत. त्यामुळे अभिनेत्याचा एखादा लूक किती जास्त चर्चिला जाऊ शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. ९० च्या दशकापासून रसिकांच्या मनात आपल्या अभिनयाने शाहरुख खानने एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्रेमकथांबरोबरच विविध विषयांवरचे चित्रपट साकारणारा शाहरुख वयाच्या पन्नाशीतही चाहत्यांमध्ये तितकाच भाव खाऊन जातो.