'ती'फोल्क सिंगर. प्रसिध्द , नावाजलेली. पण जेव्हा पासून कोविड 19 चा संसर्ग झाला तिला आपलं आवडतं काम करताच येत नव्हतं. लसीकरण सुरु झाल्यापासून लोककला कार्यक्रमांचं सादरीकरण सुरु झालं, पण तिला मात्र सहभाग घेताच येत नव्हता. कारण नियम आडवा येत होता. नियमाप्रमाणे सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लस घेतलेली हवी, त्याच प्रमाणपत्रं दाखवायला हवं नाहीतर नुकताच कोरोना होवून त्यातून बरं झालेलं हवं. तिला लस घ्यायची नव्हती. म्हणून तिने स्वत:ला कोरोना होवू देण्याचा पर्याय स्वीकारला.
Image: Google
हना होरका ही 57 वर्षांची लोककलाकार कोरोनामुळे गेली आणि ही बातमी वाचून तिच्याविषयी जगभरातल्या लोकांनी हळहळ व्यक्त केली. का केलं तिनं असं असा प्रश्न उपस्थित झाला. पण 'आपल्या आईनं हे मुद्दाम केलं, तिने असं करायला नको होतं, आम्हाला कोरोना झाल्यावर तिने आमच्यापासून वेगळं राहायला हवं होतं. पण ती आमच्याजवळ राहिली. तिला कोरोना झाला. आम्ही बरे झालोत पण ती मात्र गेली!' असं जान रेकनं माध्यमांशी बोलतांना सांगितलं.
Image: Google
हना होरका ही झेक प्रजासत्ताक येथील झेक लोककला पथकाची जुनी सदस्य होती. आपल्या कलापथकासमवेत ती कार्यक्रम करायची. त्यात लोकगीतं सादर करायची. ही तिची आवड होती आणि कामही. पण कोविड 19 चा संसर्ग सुरु झाला आणि सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर तेथील सरकारनं निर्बंध घातले. लसीकरण सुरु झाल्यानंतर पुन्हा सार्वजनिक कार्यक्रमांना मंजूरी मिळाली. फक्त कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोरोना लसीकरणाचा पुरावा सादर करणं झेक प्रजासत्ताक सरकारनं अनिवार्य केलं. जर नुकताच कोरोना होवून त्यातून बरं झालं असल्यास लसीकरणाचा पुरावा न देताही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी झेक प्रजासत्ताक सरकारनं तेथील जनतेला दिली होती.
Image: Google
हना होरकाच्या लोककलापथकानं कार्यक्रम सादर करायला सुरुवात केली होती पण हनाला इच्छा असूनही सहभागी होता येत नव्हतं. कारण काही दिवसांपूर्वी तिच्याकडे लसीकरणाचा पुरावा नव्हता आणि तिला नुकताच कोरोनाही होवून गेलेला नव्हता. हनाच्या नवऱ्याने आणि मुलानं लस घेतली होती. ते हनाला लस घेण्याचा आग्रह करत होते. पण हना हट्टाला पेटली होती. तिला लस घ्यायचीच नव्हती. लसीकरणावर तिचा विश्वास नव्हता. तिचा विश्वास होता तो कोरोना झाल्यास शरीरात कोरोनाविरुध्द लढण्याचे प्रतिपिंड ( ॲण्टिबाॅडीज) नैसर्गिकरित्या तयार होतात यावर .
कोरोनाविरुध्द सुरक्षेसाठी तिला लस घेणं मान्य नव्हतं. पण काही दिवसांपूर्वी तिच्या नवऱ्याला आणि मुलाला कोरोना झाला. अशा परिस्थितीत हनानं त्यांच्यापासून अंतर राखून वेगळं राहायला हवं होतं. पण तिनं तसं केलं नाही. ती कोरोना झालेल्या नत्वऱ्या आणि मुलासोबत त्याच घरात राहिली. त्यांच्यासोबत वावरली आणि तिलाही कोरोना झाला. पण यामुळे ती घाबरुन गेली नाही की तिला दु:खही वाटलं नाही. उलट तिला ही आपल्या लोककलापथकात परतून कार्यक्रम करण्याची ही सुवर्णसंधी वाटली. हनावर कोरोनाचे औषधोपचार सुरु होते. ती बरीही व्हायला लागली होती. तिने मी आता बरी होते आहे आणि आपण लोककला पथकात पुन्हा लवकरच परतू असा मेसेज आपल्या लोककला पथकाच्या सदस्यांना केला. पण त्यानंतर दोनच दिवसांनी त्रास वाढून तिचा मृत्यू झाला. 'आपली आई हट्टानं गेली. तिने लस घ्यायला हवी होती. आपण तिला लस घेण्याचा खूप आग्रह केला, पण तिनं ऐकलं नाही. आपण लस घेण्याचा आग्रह केला की ती भावनिक व्हायची. माझ्या आईनं तिच्या हट्टानं जीव गमावला' असं तिच्या मुलानं जाननं माध्यमांना प्रतिक्रिया देतांना सांगितलं. शेवटी "माझ्या आईसारखी लस न घेण्याची चूक करु नक' अशी हात जोडून त्यानं विनंतीही केली.
Image: Google
एका लोककलावंतानं आपला जीव अशा पध्दतीनं गमवावा याची हानी केवळ त्या कुटुंबालाच नाही तर तिच्या लोककला पथकाला, ती ज्या लोककलेची सेवा करत होती त्या लोककलेलाही सहन करावी लागली. अशी हळहळ व्यक्त करणाऱ्य प्रतिक्रिया जगभरातून व्यक्त होत आहेत.