शेन्निस पलासियोस. तिचं नाव. ती सध्या मिस युनिव्हर्स आहे. आणि नुकतीच भारताच्या दौऱ्यावर होती. ताज महाल पहायला गेली आणि हरखून गेली. एरव्ही पर्यटक जसे स्वत:चे ताजसह फोटो काढतात त्याच उत्साहात ही २३ वर्षांची मुलगी ताजमहालसाेबत फोटो काढत होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलताता तिनं सांगितलंही की, मी पहिल्यांदाच भारतात आले. मला हा देश, इथली संस्कृती हे सारं समजून घ्यायला आवडेल. आशिया दौऱ्यातला भारत हा माझा शेवटचा मुक्काम होता. जसा मला भारत नवीन तसंच इथल्याही अनेक लोकांना माझा देश माहिती नसेल. जगभरात कुणालाच माझा देश फारसा परिचयाचा नाही. निकारागुआ. हा लहानसा देश आहे. मला मिस युनिव्हर्सचा किताब मिळाल्यानं आता जगभरात आमच्यासारख्या लहान देशांची निदान लोकांना ओळख तरी होईल!’
खरंतर हे सारं वाचातान असं वाटलं असेल की त्यात काय एवढं मिस युनिव्हर्स कायमच असं पाठ केल्यासारखं भाषण करतात.ते तसं तिनं केलंही असेल पण शेन्नीसच्या कहानीत वेगळाच ट्विस्ट आहे.ती, तिचं कुटुंब आणि कधीच तिच्या मायदेशात म्हणजे निकारागुआत परत जााऊच शकणार नाही. खरंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये जेव्हा ती मिस युनिव्हर्स झाली तेव्हा तो एका लहानशा गरीब देशासाठी अत्यंत सन्माचा क्षण होता. जगभर तिचे आणि तिच्या संघर्षाचे कौतुक करणाऱ्या बातम्याही प्रसिध्द झाल्या. मात्र त्याचकाळात निकारागुआत काही निदर्शनंही झाली. ही तरुणी आपल्या देशाच्याच विरोधात बोलते, ती देशप्रेमी नाही असे शिक्के मारण्यात आले.त्याचं कारण म्हणजे २०१८ साली विद्यमान सरकारविरोधात प्रचंड निदर्शनं झाली होती. त्या निदर्शनात शेन्नीसही सहभागी झाली होती. तिथल्या स्थानिक सरकारला तिनं उघड विरोध केला, जाहीर मतं मांडली.सत्तेविरोधात उभं राहण्याची किंमत तर मोजावीच लागते. कुठल्या सत्तेला अशी व्यक्ती आवडते जी जगभरात मान सन्मान कमावते पण स्थानिक सत्तेविरुद्ध मात्र जाहीर बोलते.
शेन्नीसचंही तेच झालं आहे. मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकल्यानंतर आता ती जगभरातल्या सर्व देशात फिरते आहे. पण मायदेशातून मात्र तिची हकालपट्टीच झाली आहे आणि देशनिकालीचं हे दु:ख मनात ठेवून तिला जगसुंदरीचा मुकूट डोईवर मिरवावा लागतो आहे.मिस निकारागुआ स्पर्धा भरवतात त्या आयोजकांनीही सरकारविरोधी भूमिका घेतली होती. त्यामुळे आयोजक सेलिब्रिटी नावाच्या महिलेस आणि तिच्या मुलीला एअरपोर्टवरच डिटेन करुन मेक्सिकोत पाठवण्यात आले.तेच शेन्नीसच्या आजी आणि भावासंदर्भातही झालं. त्यांना देश सोडून जाण्यास सांगण्यात आलं. पुढे त्यांना अमेरिकन व्हिसा मिळाला आणि ते अमेरिकेत रवाना झाले.
आता शेन्नीस तर जग प्रवास करते आहेच. मात्र तिची मिस युनिव्हर्सची मुदत संपल्यावर मात्र तिला मायदेशी परत जाता येण्याची काहीच चिन्हं नाहीत. तिलाही अमेरिकतेच आसरा अर्थात मिळेलच. मात्र देश कायमचा सुटला.यासंदर्भात बातम्या प्रसिध्द झाल्यानंतर जगभरात अनेकांनी प्रश्न उपस्थित केला की तिने सरकारवर टिका केली असेलही पण देशासाठी तर इतका मोठा सन्मान आणला. मिस युनिव्हर्स होणारी ती पहिली निकारागुअन तरुणी. त्याआधी ती मिस वर्ल्डही झाली. जगातले सगळ्यात मोठे चार ब्यूटी पेजंण्ट जिंकण्याचा सन्मान तिच्या नावावर आहे.एका गरीब आणि मागास देशातील तरुणीने आपल्या देशाचे अभिमानाने नेतृत्व करत आंतरराष्ट्रीय पटलावर देशाविषयी, तिथल्या संस्कृतीविषयी सातत्यानं बोलणंही देशाची शान वाढवतच ना!अर्थात सोशल मीडियातल्या अनेक पोस्ट किंवा वृत्तपत्रातील बातम्यांमुळे निकारागुअन सरकारने काही आपला निर्णय फिरवण्याची शक्यताच नाही. आजवर तिथल्या सरकारनं ज्या काही महिलांना ‘देशनिकाली’ काढलं आहे त्यांनी युरोपात, अमेरिकेत आसरा घेतला. त्यांनीही देशनिकालीची दु:ख यादरम्यान जाही मांडली.मात्र त्यानं वास्तव बदलत नाही.मिस युनिव्हर्स शेन्नीस आता बहूतेक कधीही आपल्या मायभूमीत परत जाऊ शकणार नाही!आपल्याला मतं असणं, भूमिका घेणं, ती जाहीर मांडणं याची किंमत चुकवावी लागतेच. तीच किंमत शेन्नीस चुकवते आहे.
निकारागुआ कुठं आहे?निकारगुआ हा कॅरेबिअन बेटाजवळचा अगदी लहानसा देश. या देशाला लॅण्ड ऑफ फायर ॲण्ड वॉटर म्हणतात. कारण या देशात किमान १९ जिवंत ज्यालामुखी आहेत. आणि अनेक लहान तलाव आहे. देश अतिशय सुंदर. पण अत्यंत मागास आणि गरीब. त्यात सतत राजकीय घडामोडी आणि विद्रोहांनी हादरलेला. आपल्या विरोधातील कोणताच सूर तिथल्या सत्तेच्या कानाला रुचत नाही. आणि मग देशनिकाली करत अशी शिक्षा दिली जाते.जग जवळ येत आहे वगैरे गप्पा सतत होतात पण लहानशा देशातली ही दडपशाही मात्र जगाला दिसत नाही आणि दिसली तरी कुणी काही बोलत नाही.