Join us  

शो ऑफ आर्मपिट हेअर! मडोनाच्या लेकीचे बंडखोर फॅशन स्टेटमेंट; गेले उडत जगाचे सौंदर्य नियम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 3:47 PM

मेट गाला २०२१ या सोहळ्यात सगळ्यात गाजलेली बाब म्हणजे मॉडेल लोर्डेस लियॉनने हात वर करून दाखविलेले तिचे आर्मपिट हेअर....

ठळक मुद्देहल्ली तरूण मुलीच आम्ही व्हॅक्सिंग करणार नाही, आमच्या शरीरावरचे केस नैसर्गिकपणे जसे वाढायचे तसे वाढतील, तुम्हाला त्याचं काय? असं म्हणत मोठी चळवळ उभारत आहेत.

न्यूयॉर्क शहरात नुकताच मेट गाला हा फॅशन जगतातला सर्वोच्च समजला जाणारा सोहळा पार पडला. या सोहळ्यात नेहमीप्रमाणेच सेलिब्रिटी अतिशय चित्रविचित्र पोषाख करून आले होते. त्यामुळे कुणी काय घातलं आणि किती विचित्र अवतार केला, याची तर तुफान चर्चा सोशल मिडियावर रंगलेलीच होती. पण त्या तोडीचीच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक चर्चा झाली ती मॉडेल लोर्डेस लियॉनच्या काखेतल्या केसांची. तिने भर सोहळ्यात हात वर करून तिच्या काखेतले केस दाखविले. सौंदर्याच्या दुनियेत सर्वोच्च स्थानी असलेल्या सोहळ्याने हे असे आक्रित करणे म्हणजे तर तेथील ज्येष्ठा- श्रेष्ठांना एवढेच नव्हे तर नव्याने या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांना देखील भोवळ आणणारेच होते. सध्या लोर्डेस लियॉनचे हे फोटो जगभर व्हायरल झाले असून सोशल मिडियावर प्रचंड धुमाकुळ घालत आहेत. 

 

कोण ही लोर्डेस लियॉन?पॉपस्टार मॅडोना हिची मुलगी म्हणजे लोर्डेस लियॉन. मेट गाला सोहळ्यात यावर्षी लोर्डेस पहिल्यांदाच सहभागी झाली होती. पदार्पणातच सौंदर्याचे तथाकथित सर्वच नियम धाब्यावर बसवून लोर्डेसने उचललेले हे पाऊल एका बाजूने तिच्यावर टिकास्त्र सोडणारे तर ठरलेच पण दुसऱ्या बाजूने तेवढ्याच बुलंद आवाजात तिच्या धाडसाचे कौतूक करणारेही ठरले. शब्दश: हा सोहळा यंदा लोर्डेसने गाजविला आहे.

कसा होता लोर्डेसचा लूक?या साेहळ्यात इतर सेलिब्रिटींनी जशी अतरंगी वेशभुषा केली होती, त्या तुलनेत लोर्डेसचा लूक खरोखरच बरा म्हणावा असा होता. तिच्यासाठी एक मस्त कस्टम ड्रेस तयार करण्यात आला होता. ब्राईट पिंक रंगाचा हा एक लाँग स्कर्ट होता. ब्रालेट स्टाईल ब्लाऊज आणि प्लीट्स घातलेला स्कर्ट क्रिस्टल्स लावून सजविलेला होता. लोर्डेसने तिचे केसही मधोमध भांग पाडून मोकळे सोडले होते. ती जेव्हा सोहळ्यात आली आणि कार्पेटवर चालू लागली, तेव्हा अनेक कॅमेरे तिच्यावर सरसावले. तिची प्रत्येक कृती, हालचाल टिपून घेऊ लागले. अशातच तिने पोज देताना तिचा एक हात वर केला आणि त्यानंतर मात्र सगळेच अचंबित झाले. एखाद्या तरूण महिलेने हात वर केला तर तिची काख नेहमीच व्यवस्थित व्हॅक्स केलेली, चकचकीत दिसेल असा एक समज सर्वसामान्यांच्या मनात असतो. त्यात लोर्डेस तर सौंदर्य जगतात नेहमीच वावरणारी. त्यामुळे तिचा हात वर जाताच, असे काही आपल्याला बघावे लागेल, याचा विचारच तिथे कोणी केलेला नव्हता. त्यामुळे जे काही झाले, ते तिथल्या प्रत्येकासाठीच धक्कादायक ठरले. 

 

का केले लोर्डेसने असे ?लोर्डेस लियॉनने एवढ्या मोठ्या सोहळ्यात हे असे का केले असावे, अशी शंका सगळ्यांच्याच मनात येते. याचे उत्तर थेट आपल्याला भुतकाळात घेऊन जाते. तिची आई मॅडोनाने देखील एकदा एका सोहळ्यात असाच प्रकार केला होता. नाही केले मी अंडरआर्म्स, मग काय? कशाला एवढा बाऊ करायचा? असा प्रश्न तेव्हाही तिच्या नजरेत होता आणि तोच प्रश्न आज लोर्डेसच्याही डोळ्यात दिसला. सोशल मिडियावर अनेक महिलांनी लोर्डेसच्या धाडसाचे प्रचंड कौतूक केले आणि आम्ही देखील लोर्डेसच्या विचारांचे असून तिच्यासारखेच आहोत, असेही काही जणींनी सांगितले. 

 

व्हॅक्सिंग न करण्याचा जबरदस्त ट्रेण्ड...एकदा का मुलगी १७- १८ वर्षांची झाली की हळूहळू सुंदर दिसण्याचे वेध तिलाही लागतात आणि मग सौंदर्याच्या नावाखाली ती तिच्या शरीरावर अन्याय करण्यास सुरुवात करते. सुरुवातीला आयब्रोज केले जातात, नंतर अप्परलिप्स, मग हातांचे व्हॅस, अंडरआर्म्स, मग पायाचे व्हॅक्स आणि मग शेवटी तर प्युबिक एरिया व्हॅक्सिंगपर्यंत मजल जाते. सुरुवातीला हौशीखातर हे सगळे केले जाते. पण हळू- हळू व्हॅक्सिंग करताना होणारा त्रास सहन होत नाही. आयब्रोज करायच्या म्हंटलं तरी डोळ्यात पाणी येतं. पण जनरित किंवा सौंदर्य जगताचे सो कॉल्ड नियम म्हणून किंवा असे केस वाढलेले हात, पाय, भुवया जगाला कसे दाखवायचे, या भीतीमुळे अनेक जणी वर्षानुवर्षे हा त्रास साेसत जातात. 

पण हल्ली मात्र तरूण मुलीच या विरोधात उभ्या राहिल्या असून आम्ही व्हॅक्सिंग करणार नाही, आमच्या शरीरावरचे केस नैसर्गिकपणे जसे वाढायचे तसे वाढतील, तुम्हाला त्याचं काय? असं म्हणत मोठी चळवळ उभारत आहेत. व्हॅक्सिंगचा त्रास सोसणाऱ्या पण मनापासून ते आवडत नसणाऱ्या अनेक महिला मोठ्या धाडसाने त्यांना भेटत आहेत, त्यांच्या मोहिमेत सहभागी होत आहेत. मॅडोना किंवा आता तिची लेक लोर्डेस ही अशाच तर सगळ्या महिलांचं प्रतिनिधित्व करत आहे. सौंदर्याच्या नावाखाली नाही सोसणार आम्ही आता त्रास, जसे असू तसेच राहू आणि सुंदर दिसू, असेच तर आजची ही तरूणाई जगाला ओरडून सांगत नाही ना? म्हणूनच तर कदाचित लोर्डेसने हा आवाज अख्ख्या सौंदर्य जगतापर्यंत पोहोचविण्यसाठी मेट गालासारख्या सोहळ्याची निवड केली नाही ना? असे अनेक प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलमेट गालाहॉलिवूड