दिवाळी हा वर्षातला मोठा सण असतो. त्यामुळे या दरम्यान विविध कारणांनी आपण घरात असलेली चांदीची भांडी आवर्जून वापरायला काढतो. यामध्ये अगदी गुलाबदाणी, अत्तरदाणी, चांदीच्या वाट्या, तांब्या-भाडी, चमचे, ताम्हण, दिवे, समई अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश असतो. या वस्तू एरवी आपण लॉकरमध्ये ठेवलेल्या असल्याने त्याला पुरेशी हवा लागलेली नसते. त्यामुळे या वस्तूंवर एकप्रकारचा काळा थर जमा होतो. लक्ष्मीपूजन, धनत्रयोदशीची पूजा, पाडवा आणि भाऊबीजेची ओवाळणी यासाठी आपण हे सगळे आवर्जून वापरतो (Silver Utensils Cleaning Tips and Hacks for Diwali).
ते काळे असेल तर अजिबात चांगले दिसत नाही. म्हणूनच ही भांडी आपल्याला दिवाळीच्या आधी स्वच्छ करुन ठेवावी लागतात. आता चांदीची भांडी स्वच्छ करायची म्हणजे ती सोनाराकडे नेणं आली असं आपल्याला कदाचित वाटू शकते. पण तसे करण्याची काहीच गरज नाही. कारण घरच्या घरी काही सोप्या ट्रिक्स वापरुन आपण ही भांडी अगदी झटपट स्वच्छ करु शकतो. यामुळे ही चांदीची भांडी नव्यासारखी चमकण्यास मदत होते. पाहूयात या ट्रिक्स कोणत्या आणि त्या कशा वापरायच्या.
१. चांदीची मुर्ती स्वच्छ करण्यासाठी दात घासण्याच्या पावडरचा चांगला उपयोग होतो. घरात असलेला एखादा जुना ब्रश किंवा कापड घेऊन त्यावर ही पावडर घातली आणि त्याने भांडी घासली तर चांदीची भांडी, देवाच्या मुर्ती, दागिने लगेचच स्वच्छ होतात.
२. पांढरी रांगोळी आणि मीठ किंवा टूथपेस्ट आणि मीठ यांच्या एकत्रित मिश्रणानेही चांदीची भांडी आणि देव घासावेत. यामुळे त्यावरचा काळेपणा जाऊन भांडी चमकण्यास मदत होते. अशाचप्रकारे आपण जोडवी, पैंजण, छल्ला, कंबरपट्टा यांसारखे चांदीचे दागिनेही सहज स्वच्छ करु शकतो.
३. लिंबात सायट्रिक अॅसिड असते. त्यामुळे कोणताही धातू त्याने स्वच्छ होऊ शकतो. लिंबाच्या रसात बेकिंग सोडा एकत्र करा. ब्रश किंवा कापसाच्या बोळ्यानं हे मिश्रण भांड्यांना लावा. काही वेळाने ही भांडी पाण्याने स्वच्छ धुवून टाका. तसेच चांदीची भांडी स्वच्छ करण्यासाठी अॅल्यूमिनियम फॉयलही वापरू शकतो.
४. एका लहान भांड्यात एक चमचा मैदा, एक चमचा मीठ आणि एक चमचा व्हिनेगर घालून पेस्ट बनवा. त्याचा पातळ थर आपल्या भांड्यांना लावा आणि १५ ते २० मिनिटे ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने भांडी धुवा आणि सुकवा. त्यामुळे भांडी चकाकण्यास मदत होईल.